धनंजय रिसोडकर, लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६२ वी राज्य हौंशी मराठी नाट्य स्पर्धा २० नोव्हेंबरपासून राज्यभरात सुरु होणार आहे. मात्र यंदा नाशिकच्या सहभागी नाटकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असून गतवर्षीच्या २८ नाटकांवरुन हे प्रमाण २२ नाटकांपर्यंत घसरले आहे. त्यात आठवडाभरात काही अन्य केंद्रांवरील, हिंदी पट्ट्यातील मराठी संस्थांचा समावेश करण्याचे प्रयत्न सुरु असले तरी त्यात फार फरक पडण्याची शक्यता कमीच आहे. नाशिकमधील स्पर्धा २० नोव्हेंबरपासून प्रारंभ होऊन १३ डिसेंबरपर्यंत रंगण्याची शक्यता आहे.
या स्पर्धांमध्ये नाशिक शहरातीलच संघांचा प्रामुख्याने समावेश आहे. नाशिकच्या प. सा. नाट्यगृहात दररोज संध्याकाळी ७ वाजता नाशिक विभागाची प्राथमिक फेरी रंगणार आहे. मात्र २ आणि ३ डिसेंबर या दोन तारखांना प.सा.नाट्यगृह अन्य कार्यक्रमांसाठी आधीपासून नोंदणी झाली असल्याने हे दोन दिवस वगळूनच नाटकांना तारखा दिल्या जाणार आहेत. आठवडाभरात सर्व संस्थांच्या त्रुटींची पूर्तता झाल्यानंतर नाटकांच्या अंतिम तारखांसह संपूर्ण नाट्य स्पर्धेच्या तारखांची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.