नरेंद्र दंडगव्हाळ
सिडको : मागील दोन तीन महिन्यांमध्ये नाशिक शहरासह सिडको भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत होती. पॉझिटिव्ह रुग्णांना ऑक्सिजन तसेच बेड देखील उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या. सिडको परिसरात दररोज अडीच ते तीन हजार रूग्ण आढळत होते, ही संख्या सध्या घटली असून आता दररोज केवळ दोनशे ते अडीचशे इतकेच रुग्ण सिडको परिसरात आढळत असल्याने ही समाधानाची बाब असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालय अंतर्गत गोविंद नगर, सिडको, अंबड, पाथर्डी आदी भागांचा समावेश येतो. मागील दोन तीन महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या झपाट्याने वाढली. विशेष करून मे महिन्यात ही संख्या अधिक वाढली होती. या दिवसात दररोज दोन ते अडीच हजार रुग्ण वाढत होते. यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. सिडको भागातील मोरवाडी ,उंटवाडी, पाथर्डी फाटा ,अंबड आदी भागातील स्मशानभूमीत मृतदेह सरण करण्यासाठी देखील वेटिंग करण्यात येत होती .अमरधाम मधील कर्मचारी २४ तास काम करीत होते. यामुळे सिडकोसह परिसरात चिंतेचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सिडको भागातील शासकीय तसेच खाजगी हॉस्पिटल अक्षरशः फुल्ल झाले होते. अनेक रुग्णांना यामुळे घरीच उपचार करावे लागत होते. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सिडको भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले. सिडको भागात आजपर्यंत २२ हजार १८६ इतके रुग्ण आढळले. यातील २१ हजार २२४ इतके रुग्ण बरे झाले असून आजमितीस केवळ ९६२ इतके रुग्ण उपचार घेत आहे.
मागील महिन्यात दररोज हजारांहून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत होते. यामुळे महापालिकेची यंत्रणा देखील सुन्न झाली होती. महापालिकेने मे महिन्यापासून कोरोना प्रतिबंधक लस देण्याची प्रक्रिया तसेच टेस्ट करणे, ट्रेसिंगवर भर दिल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले. गेल्या आठवड्यापासून दररोज केवळ अडीचशे ते तीनशे पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने ही समाधानाची बाब असल्याचे बोलले जात आहे. महापालिकेच्या सिडको परिसरात समावेश असलेल्या सिडकोसह गोविंद नगर, अंबड, पाथर्डी फाटा या परिसरात रुग्ण संख्या कमालीची घट झाल्याचे मनपा सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
कोट---
महापालिकेच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून प्रतिबंधक लस देणे असो अथवा अँटिजन टेस्ट करणे यावर अधिक भर दिला आहे. सिडको डिव्हिजन मधील अचानक चौक, मोरवाडी येथील श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल , हेडगेवार चौक, अंबड महालक्ष्मी नगर येथील समाज मंदिर आदी भागात सर्व वैद्यकीय टीम देखील सातत्याने कामकाज करीत असून यामुळे रुग्ण संख्येत घट झाली आहे.
- छाया साळुंखे
मुख्य वैद्यकीय अधिकारी, सिडको विभाग