पाथरे : मोर हा राष्ट्रीय पक्षी असून, त्याची काळजी घेणे आणि संवर्धन करणे ही आपलीही जबाबदारी आहे. अनेक दुर्मीळ पशू-पक्षी नामशेष होण्याच्या यादीत मोराचाही समावेश आहे. सिन्नर तालुक्यातील पाथरे बुद्रुक, मीरगाव, माळवाडी, वारेगाव परिसरात गवळण, धोधना, जांब नदीकाठावर मोरांच्या संख्येतही घट होत आहे. मोर विविध समस्यांच्या जाळ्यात अडकल्याचे चित्र या भागात पहावयास मिळत आहे. काही वर्षांपूर्वी या परिसरात मोरांची संख्या लक्षणीय होती. पर्यावरणाचा ºहास, झाडांची कत्तल, पाण्याचे दुर्भिक्ष, मानवाकडून शिकार होणे, भटक्या कुत्र्यांचे हल्ले अशा अनेक कारणांमुळे येथील मोरांच्या संख्येत घट होत आहे. एकीकडे विकास, तर दुसरीकडे नैसर्गिक संपत्तीचा ºहास असे चित्र सध्या येथे पहावयास मिळत आहे. मुळातच पावसाचे प्रमाण कमी आणि त्यातच पडलेल्या पावसाचे पाणी अडवण्यासाठीच्या उपाययोजना कमी यामुळे या वन्यजिवांना मुबलक पाणीसाठा उपलब्ध होत नाही. वन्यजीव रक्षणासाठी पाणीसाठे, वनतळे, अन्न नाही ना आश्रय ठिकाणे नाहीत. गेल्या काही वर्षांपासून तपमानात दिवसागणिक वाढ होत आहे. पाथरे येथील श्रीराम उपसा जलसिंचन योजना, वारेगाव उपसा जलसिंचन योजना, जयमल्हार उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून जेव्हा परिसरातील शेतीला आवर्तन कालव्याद्वारे पाणीपुरवठा होतो तेव्हा याकाळात मोरांना पाणी आणि गारवा मिळतो. परंतु इतर वेळेला मात्र उन्हातान्हात मोरांना भटकंती करायची वेळ येत आहे. अपुऱ्या जलसाठ्यामुळे, अन्नामुळे मोरांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे अनेक मोर मृत्युमुखी पडत आहेत. कुत्रे त्यांच्यावर हल्ला करतात तर कधी मानवी शिकार करणाºयांपासून त्यांना स्वत:चा बचाव करावा लागतो. पाण्याच्या कमतरतेमुळे मोरांची संख्या कमी होत आहे. यावर वनविभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
सिन्नर तालुक्यात विविध गावांमध्ये घटतेय मोरांची संख्या पाण्यासाठी भटकंती : पाथरे बुद्रुक, मीरगाव, माळवाडी, वारेगावसह जांब नदीकाठावरील चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 12:48 AM