नाशिक : काेरोना बळींनी सातत्याने पाचव्या दिवशी तीसहून अधिक वाढ कायम ठेवली असून, रविवारी (दि.१२) पुन्हा ३१ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंतच्या बळींची एकूण संख्या २,६८२ वर पोहोचली आहे, जिल्ह्यात एकूण ३७४१ रुग्ण नव्याने बाधित, तर ३७९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात प्रथमच प्रलंबित अहवालांची संख्या दहा हजारांवर पोहोचली असल्याने आठवडाभर बाधितांचा आकडा मोठाच येण्याची चिन्हे दिसत आहेत.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच वाढणारे बळी आणि प्रलंबित राहणारे अहवाल हा सध्याच्या चिंतेचा विषय आहे. दरम्यान, जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये १८४६, तर नाशिक ग्रामीणला १७९१ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात २८ व जिल्हाबाह्य ७६ रुग्ण बाधित आहेत, जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ०९, ग्रामीणला २१, तर जिल्हाबाह्य १ असा एकूण ३१ जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा हतबल ठरली आहे. गत दोन दिवसांपासून प्रलंबित अहवालांच्या संख्येने आतापर्यंतच्या सर्वाधिक प्रलंबित संख्येची नोंद केली. शनिवारी ९६४१ प्रलंबित संख्येत अजून भर पडल्याने हा आकडा रविवारी १० हजार ८५१ वर पोहोचला आहे. त्यामुळे प्रलंबित संख्येत सतत पडणारी भर चिंतेचा विषय ठरली आहे.
इन्फो
सर्वाधिक बळींची वाढ
मृतांच्या संख्येत गत पाच दिवसांपासून सातत्याने तीसहून अधिक बळींची भर पडली आहे. त्यामुळे अवघ्या पाच दिवसात जिल्ह्यातील बळींच्या संख्येत १५०ने वाढ झाली आहे. बळींमधील ही वाढ आतापर्यंतच्या कोणत्याही एका आठवड्यातील सर्वाधिक वाढ आहे.
इन्फो
अहवालाची प्रतीक्षा चार दिवस
जिल्हा तसेच राज्य स्तरावरून मोठ्या प्रमाणात नमुने दाखल होत असल्याने एकूण बाधितांच्या अहवालांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे गत आठवड्यापर्यंत अहवालासाठी असलेली दोन दिवसांची प्रतीक्षा आता जवळपास चार दिवसांवर जाऊन पोहोचली आहे.