दरवर्षी सप्टेंबर महिन्यात सर्व शाळांची पटसंख्या व त्यावर आधारित शिक्षकांचे समायोजन केले जाते. यंदा मात्र कोरोनामुळे शाळा सुरूच झालेल्या नाहीत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा एक ते सात व नंतर खासगी माध्यमिक शाळांमध्ये पुढील शिक्षणासाठी दाखल केले जातात. यंदा मात्र शासकीय व खासगी शाळाही बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या नवीन प्रवेशाची पद्धतीही फारशी राबविण्यात आलेली नाही. मात्र विद्यार्थ्यांची संख्या ‘जैसे थे’ राहिल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.
नाशिक जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३२६६ शाळा असून, या शाळांमध्ये दोन लाख ६७ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकांचे लॉकडाऊनच्या काळातही वाटप करण्यात आल्याने शिक्षकांकडून अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. काही शिक्षकांनी थेट गावशाळा सुरू करून चावडीवर, समाजमंदिरात, वाड्या-वस्त्यावर जाऊन शिकविण्यास सुरुवात केली आहे.
----------
शाळा सुरू झाल्यावर येईल अंदाज
सध्या प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची गळती किती झाली हे सांगता येत नाही. मात्र शाळा सुरू झाल्यावर त्याची निश्चित आकडेवारी समोर येईल. एक मात्र निश्चित कोरोनाची भीती अजूनही कायम आहे.
-------
प्राथमिक शाळेतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी माध्यमिक शाळेत प्रविष्ट झाले आहेत; परंतु ते सारे शिक्षणाच्या प्रवाहात आहेत. जोपर्यंत शाळा सुरू होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांची गळती लक्षात येणार नाही.
- राजीव म्हसकर, शिक्षणाधिकारी
------