नाशिक : शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, आत्तापर्यंत २०५ संशयित डेंग्यू रुग्णांचे नमुने शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. डेंग्यूची लागण असल्याचे आढळल्यानंतर खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी पालिकेला त्वरेने कळविणे आवश्यक असून, असे न करणाऱ्या व्यावसायिकांना नोटिसा पाठविण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.गेल्या काही दिवसांत डेंग्यू रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असली, तरी जोपर्यंत शासकीय प्रयोगशाळेत अशा संशयित रुग्णांना डेंग्यू झाल्याचे सिद्ध होत नाही तोपर्यंत डेंग्यू रुग्ण अधिकृत आहेत असे मानता येणार नाही. चालू महिन्याच्या २८ दिवसांत २०५ संशयित डेंग्यू रुग्णांचे नमुने शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी १२३ अहवाल प्राप्त झाले असून, ६९ जणांना डेंग्यू झाल्याचे निषन्न झाले आहे. त्यातील ५१ रुग्ण महापालिका हद्दीतील असून, उर्वरित १८ रुग्ण शहराबाहेरील असल्याचा दावा पालिकेच्या वतीने करण्यात आला आहे. सध्या ८२ संशयित डेंग्यू रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असली, तरी खासगी रुग्णालयांत किती रुग्ण आहेत याची पालिकेकडे स्पष्ट माहिती नाही. वास्तविक साथीचे रोग असलेल्या रुग्णांची माहिती तातडीने पालिकेच्या वैद्यकीय विभागाला देणे बंधनकारक आहे. अशी माहिती न देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. माहिती न दिल्यास संबंधितांना नोटिसा बजावण्याची तयारी करण्यात आल्याचे वैद्यकीय विभागाच्या सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
संशयित डेंग्यू रुग्णांची संख्या दोनशेवर
By admin | Published: October 29, 2014 11:52 PM