आडगाव : आडगाव ट्रक टर्मिनल, जकात नाका, ट्रान्सपोर्टनगर परिसरात चोरांनी धुमाकूळ घातला असून, त्यामुळे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक, ट्रकचालक त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळी थेट पथदीप बंद करून चोºया केल्या जात असल्याचे अनेक वाहनचालक व व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या परिसरात रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवून ट्रक टर्मिनल परिसरात पोलीस चौकी द्यावी, अशी मागणी येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक करत आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावर आडगाव ट्रक टर्मिनलच्या परिसरात अनेक ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी आपले बस्तान बसविले आहे. या ठिकाणी देशभरातील मालवाहू वाहने, ट्रक विश्रांतीसाठी येतात. चालकांकडे मोठ्या प्रमाणात रोख रक्कमदेखील असते. अशा चालकांवर पाळत ठेवून चोरटे आपला कार्यभाग साध्य करत आहे. याशिवाय मोबाइल, डिझेल, गाड्यांचे स्पेअर पार्टची चोरी, गाड्यांच्या काचा फोडणे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. आडगाव पोलीस स्टेशन येथून सुमारे चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे. वाहन चालक परराज्यातील असल्यामुळे त्यांना येथील पोलीस स्टेशन माहिती नसल्याने नाइलाजास्तव ते तक्रार दाखल करत नाही. परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी व येथे पोलीस चौकी द्यावी, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.
ट्रक टर्मिनल परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:16 AM