नाशिक : जिल्ह्यातील कोरोना बळींच्या संख्येत शुक्रवारी तब्बल १४ बळींची भर पडल्याने नाशिक जिल्ह्यातील बळी दोनशेचा टप्पा ओलांडून २१३वर पोहोचले आहेत. शनिवारी गेलेल्या बळींमध्ये नाशिक महानगरातील दहा, मालेगावचे दोन, तर ग्रामीणमधील दोन बळींचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकाच दिवशी गेलेल्या कोरोना- ग्रस्तांच्या बळींचा हा उच्चांक असून, त्यामुळे समस्येचे स्वरूप अधिकच तीव्र होऊ लागले आहे.नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे बळी जाण्याचे प्रमाण जून महिन्याच्या प्रारंभापासून वेगाने वाढले आहे. त्यात शुक्रवारी सर्वाधिक म्हणजे १४ बळी गेल्याने जिल्ह्यात सर्वत्र खळबळ माजली आहे. त्यातही सर्वाधिक दहा बळी हे नाशिक महानगरातील असल्याने नाशिक शहरातील मृत्यूदर कसा कमी करायचा यावर आरोग्य यंत्रणेला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मयतांमध्ये मालेगाव शहरातील दोन तसेच निफाड तालुक्यातील विंचूर आणि पिंपळगाव बसवंतच्या एका नागरिकाचा समावेश आहे.जिल्ह्यात शुक्रवारी बाधितांच्या संख्येतही तब्बल ११५ जणांची भर पडली. नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३,४९३ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक महापालिका हद्दीतील १,६९६, मालेगाव मनपाचे ९८२, नाशिक ग्रामीणचे ६९६ तर जिल्हा बाह्यच्या ११९ नागरिकांचा समावेश आहे.६२४ नवीन संशयित दाखलशुक्रवारी जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत दाखल झालेल्या संशयितांची संख्या ६२४ एवढी विक्रमी आहे. त्यात नाशिकच्या मनपा रुग्णालयांमध्ये ४३४, नाशिक ग्रामीण रुग्णालये १५२, जिल्हा रुग्णालय १७, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय नऊ जणांचा समावेश आहे. या सर्व संशयितांचे नमुने तातडीने संबंधित लॅबकडे पाठविण्यात आले असून, त्यांचे अहवाल शनिवार किंवा रविवारपर्यंत मिळणार आहेत.