नाशिक : जिल्ह्यात कोरोना बळींच्या प्रमाणात गत महिन्याच्या प्रारंभापासून अचानकपणे मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास प्रारंभ झाला. त्यामुळेच कोरोनाच्या प्रारंभापासून आतापर्यंतचे एका महिन्यातील सर्वाधिक अकराशेहून अधिक म्हणजे तब्बल १,१३९ बळी हे केवळ एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच्या कालावधीत गेले आहेत.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १५ च्या आसपास असणारे मृत्यूचे प्रमाण पहिल्या आठवड्याअखेरीस दुपटीने वाढ होऊन सातत्याने २५ आणि ३० पेक्षा अधिक राहू लागले. त्यामुळे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून वाढू लागलेले मृत्यूचे प्रमाण सातत्याने ३० ते ४० वर राहात असल्यानेच गत महिनाभरात आतापर्यंतच्या सर्वाधिक हजारहून अधिक बळींची नोंद झाली आहे. गतवर्षी सर्वाधिक बळी सप्टेंबर महिन्यात सहाशेहून अधिक होते. त्या तुलनेत गत महिनाभरातील बळींची संख्या जवळपास दुपटीहून अधिक असून, त्यातूनच या दुसऱ्या लाटेची तीव्रता आणि घातकता अधोरेखित होत आहे. रुग्णसंख्येतील वाढीपेक्षाही बळींमधील वेगाने झालेली वाढ नागरिकांच्या दृष्टीने अधिक भयावह ठरलेली आहे.
इन्फो
गतवर्षी १६ सप्टेंबरला सर्वाधिक २९ बळी
मागील वर्षी कोरोनाच्या सर्वाधिक प्रकोपाच्या काळात गतवर्षी सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक २९ बळींची नोंद झाली होती. त्यानंतर थेट एप्रिल महिन्यातच तीसपेक्षा अधिक बळींची नोंद झाली. तसेच सातत्याने बळींची संख्या ३० हून अधिक आहे. ही बळीसंख्या सातत्याने कायम असल्यामुळेच महिनाभरात बळींच्या संख्येने हजार आणि अकराशेचा टप्पा ओलांडला आहे.
इन्फो
दुर्घटनेतील बळींनंतर दुसऱ्या दिवशीही विक्रमी बळी
जिल्ह्यात यंदाच्या वर्षी २१ एप्रिलला ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यामुळे एकूण २४ बळींची नोंद एकट्या झाकीर हुसेन रुग्णालयात करण्यात आली होती. तर अन्य बळी मिळून त्या दिवशी आतापर्यंतचे सर्वाधिक ९० बळींची नोंद झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २२ एप्रिललादेखील ५५ बळींची नोंद झाली होती. अशा प्रकारे बळींमध्ये प्रचंड वाढ झाल्याने आणि त्यानंतरही चाळीसहून अधिक बळींची नोंद होण्याचे प्रमाण कायम राहिल्यानेच महिनाभरातील बळींनी भयावह टप्पा ओलांडला आहे.