नाशिक : दिवसेंदिवस वनक्षेत्राचे प्रमाण कमी होत चालल्याने वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात सापडला आहे. परिणामी वन्यजीवांच्या संख्येवरही त्याचा परिणाम होऊ लागला आहे. बुध्दपौर्णिमेच्या रात्रीपासून दुसऱ्या रविवारी (दि.२१) पर्यंत नाशिक प्रादेशिक विभागातील अभयारण्य क्षेत्रात करण्यात आलेल्या वन्यजीव प्रगणनेत सर्वाधिक कमी एक रानगवा, चितळ अन् पाच अस्वल आढळून आले.बुध्द पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या लख्ख प्रकाशात वनक्षेत्र उजळून निघते. त्यानिमित्ताने नाशिक प्रादेशिक वन्यजीव विभागाने नांदूरमध्यमेश्वर, कळसुबाई हरिश्चंद्रगड, यावल तीन अभयारण्य क्षेत्रातील गावांमध्ये मचाण बांधून वन कर्मचाऱ्यांनी रात्रभर पहारा देत वन्यजीवांच्या हालचाली टिपल्या. कळसुबाई हरिश्चंद्र गड अभयारण्य क्षेत्रात भंडारदरा शिवारात एक रानगवा तर यावल भागातील पाल वनक्षेत्रात एक चितळ आणि जामन्या वनक्षेत्रात चार व पाल वनक्षेत्रात एक असे पाच अस्वल आढळून आले. वन्यजीवांच्या प्रजातींमध्ये या वन्यप्राण्यांची संख्या उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कमी असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. तसेच सायाळदेखील (साळींदर)घटले असून यावल अभयारण्य क्षेत्रात ते केवळ चार आढळून आले. खोकडची संख्या पाच इतकीच शिल्लक राहिली आहे. त्यामध्ये दोन कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रातील राजूर वनात तर दोन यावल आणि एक अनेर डॅम परिसरात पहावयास मिळाले. यासोबतच उदमांजरचेही प्रमाण कमी झाले असून यापुर्वी विविध शहरांलगत असलेल्या खेडींमध्ये तसेच गावांमधील मळे परिसरात उदमांजर आढळून येत होते; मात्र या प्रगणनेत नांदूरमध्यमेश्वर व यावलमधील जामन्या वनक्षेत्रात प्रत्येकी एक असे दोन उदमांजर निदर्शनास आले. नाशिक प्रादेशिक विभागातील अभयारण्य क्षेत्रात लांडग्यांचेही प्रमाण कमालीचे घटले आहे. यावलमध्ये तीन आणि अनेर डॅम परिसरात चार असे केवळ सात लांडगे पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात चमकले.