नाशिक : मंगळवारी झालेला मुसळधार पाऊस आणि गोदावरीसह अन्य नद्यांना आलेल्या महापुरानंतर शहरात प्रामुख्याने पूरग्रस्त भागात साथरोगाचा प्रसार होऊ नये, याकरिता महापालिकेने उपाययोजना सुरू केली असून, त्यासाठी शहरातील खासगी रुग्णालयांचे सहाय्य घेण्यात येणार आहे. त्यानुसार शनिवारपासून शहरात पूरबाधित भागात फिरते दवाखान्यांमार्फत नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. मंगळवारी गोदावरीला आलेल्या महापुरामुळे गोदाकाठावरील अनेक झोपडपट्ट्यांसह घरांमध्ये पाणी घुसले होते. याशिवाय मुसळधार पावसामुळेही शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. आता पाऊस थांबल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असून ठिकठिकाणी साचलेले पाणी, गाळ उपसण्याचे काम सुरू झाले आहे. त्यातच पूरबाधित भागात साथरोगाचा प्रसार होऊ नये याकरिता महापालिकेचा आरोग्य व वैद्यकीय विभाग सतर्क झाला आहे. महापालिकेच्या ३० शहरी आरोग्य केंद्रांबरोबरच ७ फिरते दवाखान्यांमार्फत पूरबाधित भागातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. मात्र, मोठ्या प्रमाणावर पूरबाधित ठिकाणे असल्याने महापालिकेने त्यासाठी शहरातील खासगी रुग्णालयांचे सहाय्य घेतले आहे. त्यानुसार, उपमहापौर गुरुमित बग्गा यांच्या दालनात गुरुवारी खासगी रुग्णालयांच्या संचालकांसमवेत बैठक झाली असता शहरातील सिक्स सिग्मा, मविप्र संस्थेचे वैद्यकीय महाविद्यालय, सातपूरमधील सार्थक हॉस्पिटल, शालिमारवरील साईबाबा हॉस्पिटल, मुंबई नाका येथील शताब्दी हॉस्पिटल, वोक्हार्ट हॉस्पिटल, सुविचार, लाईफ केअर, सुजाता बिर्ला, अपोलो आणि ऋषिकेश हॉस्पिटल यांनी आपले वैद्यकीय पथक पुरविण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार, प्रत्येक रुग्णालयाकडून एक फिरता दवाखाना उपलब्ध करून दिला जाणार असून, त्यात दोन डॉक्टर्स व एक परिचारिका वैद्यकीय तपासणीसाठी तैनात असणार आहे. येत्या शनिवारपासून सदर फिरते दवाखाने नागरिकांची वैद्यकीय तपासणी करणार आहेत. आवश्यक तो औषधसाठा उपलब्ध केला जाईल अशी माहिती पालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी दिली.
साथरोग रोखण्यासाठी मनपा सतर्क
By admin | Published: August 05, 2016 1:49 AM