नाशिक : दिंडोरी रोडवरील चिंचबारी येथील ग्लोबल नर्सिंग महाविद्यालयाने शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक शुल्कामध्ये फसवणूक केल्याचा आरोप करून विद्यार्थ्यांनी आदिवासी आयुक्तालयासमोर सोमवारी (दि़२) ठिय्या आंदोलन केले़ महाविद्यालयातील शिक्षक व प्रशासनाकडून दिला जाणारा हेतुपुरस्सर मानसिक त्रास देत, अभ्यास सोडून इतर कामे तसेच आदिवासी असल्याने जातिवाचक शिवीगाळ केली जात असल्याचा आरोपही या विद्यार्थ्यांनी केला असून, या प्रकरणाची समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली़ दिंडोरी रोडवरील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळील चिंचबारी शिवारात ग्लोबल कॉलेज आॅफ नर्सिंग आहे़ या महाविद्यालयात नंदुरबार, पालघर तसेच नाशिक जिल्ह्यातील अनुसूचित जमातीमधील सुमारे शंभराहून अधिक मुले आणि मुली नर्सिंग अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत. मात्र विद्यालयाने या विद्यार्थ्यांकडून प्रवेशावेळी ५० हजार ते २ लाख रुपयांपर्यंत देणगी घेतली तसेच शैक्षणिक फी भरूनही कुठल्याही प्रकारच्या पावत्या दिलेल्या नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी इतर संस्थेत प्रवेश करून न्याय मिळवून द्यावा म्हणून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष लकी जाधव नेतृत्वाखाली आदिवासी आयुक्तालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या शिष्यवृत्तीच्या तक्रारीची दखल आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे़ यासाठी एक समिती गठित करून सखोल चौकशी केल्यानंतर शैक्षणिक फी व शिष्यवृत्तीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे़ याबरोबरच याबाबत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे तक्रार करण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना देण्यात आले़जातिवाचक शिवीगाळया महाविद्यालयात शिकविण्यासाठी तज्ज्ञ शिक्षक नाहीत, शिवाय आदिवासी असल्यामुळे विद्यार्थिनींना जातिवाचक शिवीगाळ केली जाते़ या ठिकाणी प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आली असून, गैरहजेरीसाठी सक्तीने दंडवसुली केली जात असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे़