नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे नूतन कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांनी बुधवारी कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारला. प्रभारी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी वायुनंदन यांच्याकडे पदाची सूत्रे सोपविली. यावेळी विद्यापीठातील अधिकारी उपस्थित होते. तत्कालीन कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी राजीनामा दिल्यानंतर गेल्या सात महिन्यांपासून कुलगुरूपद रिक्त होते. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडे प्रभारी कुलगुरूपदाचा पदभार सोपविण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वीच राजभवनातून वायुनंदन यांच्या नावाची कुलगुरू म्हणून घोषणा करण्यात आली. आज सकाळी वायुनंदन मुक्त विद्यापीठात दाखल झाले. यावेळी त्यांनी विद्यापीठ आवारातील यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर कुलगुरू दालनात त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. म्हैसेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.यावेळी म्हैसेकर यांनीही प्रभारी कुलगुरूपदाच्या काळात बरेच काही शिकायला मिळाल्याचे सांगून वायुनंदन यांना पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या. अधिकारी, कर्मचारी संघटनेच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला. कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास विद्यापीठातील सर्व विद्याशाखांचे संचालक, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नूतन कुलगुरू वायुनंदन यांनी पदभार स्वीकारला
By admin | Published: March 09, 2017 1:27 AM