नाशिक : राष्ट्रीय पोषणआहार सप्ताहानिमित्त पोषणआहाराची माहिती देणाऱ्या उपयुक्त अशा आहार जनजागृती प्रदर्शनाचे शालिमारवरील संदर्भ सेवा रुग्णालयात दिमाखात उद्घाटन झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपसंचालक डॉ. सुनील पाटील, डॉ. पी. एन. गुठे, डॉ. व्ही. बी. नामपल्ली, मुख्य अधीक्षिका ए. एस. पानसरे, डॉ. पुरी आदि मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन व धन्वंतरी प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. पाटील यांनी सांगितले की, आहाराचे महत्त्व हे कुणीही नाकारू शकत नाही. कुठलाही आजार बरा होण्यात योग्य आहाराचा वाटा मोठा असतो. आजार झाला तरच पथ्य पाळावेत, संतुलित आहार घ्यावा असे नाही तर आजार होऊ नये, कायम निरोगी रहावे हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून संतुलित आहाराची कास धरली पाहिजे. शस्त्रक्रिया किंवा गंभीर आजारादरम्यान उपचार सुरू असताना आहाराचे नियम पाळणे जास्त महत्त्वाचे असते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी विविध आजार व त्याला पूरक आहार, टाळावयाचा आहार यांचे तक्ते, प्रत्यक्ष पदार्थ, त्यांच्यातील घटक यांचे आकर्षक प्रदर्शन यावेळी मांडण्यात आले होते. मान्यवरांसह रुग्ण, त्यांचे नातेवाईक, नागरिक यांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट दिली व आहाराविषयीची माहिती जाणून घेतली. पोषणआहार सप्ताहानिमित्त आठवडाभर हे प्रदर्शन सुरू राहणार असून नागरिकांनी भेट देऊन माहिती घ्यावी, असे आवाहन संदर्भ रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे. आहारतज्ज्ञ रंजिता शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
पोषणआहार प्रदर्शनास प्रारंभ
By admin | Published: September 02, 2016 12:59 AM