लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासाठी पोषण आहार पुरविणाऱ्या ठेकेदाराविषयी वाढत्या तक्रारींची दखल घेत शिक्षणाधिकाऱ्यांनी पुरवठादाराला नोटीस बजावताच तो ताळ्यावर आला असून, शाळांना धान्य पुरविताना ते मोजून देण्याबरोबरच धान्य पुरवठा करणारे वाहन कोठून कुठे व कसे जाणार याची आगावू माहिती शाळांना देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, पुरवठादाराचा हा चांगुलपणा नव्याचे नऊ दिवस ठरू नये म्हणून शिक्षण विभागाने सर्वच मुख्याध्यापकांना नोटीस पाठवून धान्य मोजून घेण्याची जबाबदारी निश्चित केली आहे.
गेल्या महिन्यात मुख्य कार्यकारी अधिका-यांनी कळवण तालुक्यातील शाळांच्या पोषण आहाराची तपासणी केली असता त्यात तफावत आढळून आल्याने शाळेचे मुख्याध्यापक व विस्तार अधिका-यावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पोषण आहार पुरवठादाराच्याविरुद्ध शाळा शाळांमधून तक्रारी सुरू झाल्या. पुरवठादार धान्य व वस्तू मोजून देत नाही, त्याच्याकडे वजनकाटे नाहीत, कमी धान्याचा पुरवठा केला जातो, धान्य व वस्तू पुरवठा करण्यापूर्वी आगावू सूचना दिली जात नाही आदी स्वरूपाच्या तक्रारी झाल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुरवठादार नेकॉफ इंडिया लि. या कंपनीस नोटीस बजावून खुलासा मागविला होता. त्यात प्रामुख्याने जून व जुलै महिन्यात सुमारे ४० ते ५० टक्के तांदूळ व इतर माल पुरविला नसल्याचे आढळून आल्याबाबत खुलासा मागविण्यात आला होता. त्याचबरोबर धान्याची वाहतूक करणाºया वाहनचालकाचे नाव, मोबाइल क्रमांक, वाहनाचा क्रमांक, माल पुरविण्याचा दिनांक आदी बाबी आगावू कळविण्यास सांगण्यात आले होते. धान्य, वस्तूंचे वाटप करण्यापूर्वी ते इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याने मोजून देण्यात यावे असे ठरलेले असतानाही त्याची पूर्तता होत नसल्याबाबत पुरवठादाराला दोषी ठरविण्यात आले होते. याबाबत तीन दिवसांत पुरवठादाराने खुलासा करण्याची मुदत देण्यात आली होती. तथापि, सदरची नोटीस हातात पडताच पुरवठादार सरळ झाला असून, त्याने नोटिसीत नमूद केलेल्या मुद्द्यांच्या आधारे पोषण आहाराचा पुरवठा करताना वाहनाचा क्रमांक, तारीख, चालकाचे नाव, भ्रमणध्वनी क्रमांकाची माहिती तत्काळ सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर धान्य, वस्तूंचा पुरवठा करणाºया वाहनासोबतच इलेक्ट्रॉनिक वजनकाटे ठेवण्यात आले असून, पुरवठादाराने धान्य मोजून द्यावे व त्याचप्रमाणे मुख्याध्यापक अथवा पोषण आहाराचे काम करणाºया शिक्षकांनीदेखील धान्य मोजूनच घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.