लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील द्राक्षपंढरीत नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यातील वातावरण द्राक्षे पिकासाठी पोषक तयार झाल्याने उत्पादक व निर्यातदारांच्या आशा पल्लवित झाल्या असून, गतवर्षाच्या तुलनेत यंदा निर्यात वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मागील द्राक्ष हंगामात कोरोनाच्या परिस्थितीमुळे दिंडोरी तालुक्यातील शेतकरीवर्गाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागले होते. परंतु यंदाच्या हंगामात वातावरण पोषक तयार झाल्याने चालू हंगामात मागील हंगामात गेलेले भांडवल व नुकसान भरून निघेल, अशी अपेक्षा बळीराजाला वाटू लागली आहे. मागील संकटाची व समस्यांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी भीती वाटत आहे. जिल्ह्यातील काही भागांमध्ये द्राक्षे काढणीला सुरुवात झाली असून, जागेवर ८० ते ८५ रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. तसेच निर्यातक्षम द्राक्षांचे भाव त्यापेक्षा अधिक आहेत. मागील हंगामात द्राक्षे बऱ्यापैकी निर्यात झाले होते. प्राथमिक अंदाजपत्रकांच्या आधारानुसार निर्यातीची आकडेवारी ही जवळ जवळ एक लाख ९५ हजारांपर्यंत मिळते. सध्याचे वातावरण निर्यातीसाठी पोषक असून, बाहेरील देशात द्राक्षे योग्य वेळेत अथवा कसली अडचण न येता तयार झाल्यास मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात होईल, असा अंदाज शेतकरी व निर्यातदार यांच्यात बांधला जात आहे.
मागील द्राक्ष हंगामात साधारणपणे फेब्रुवारी ते एप्रिल या काळात कोरोनामुळे जागतिक टाळेबंदीची घोषणा केल्यामुळे हंगामाची पूर्णपणे वाट लागली होती. त्यामुळे दिंडोरीच्या द्राक्षपंढरीतील बळीराजा मेटाकुटीला आला होता. त्यामुळे द्राक्षे शेती आता नामशेष होते की काय, असा सवाल निर्माण झाला होता. कारण कोरोनामुळे सर्वत्र लाॅकडाऊनची स्थिती घोषित केल्याने मजूर मिळत नव्हते, वाहतुकीची वाहने बंद होती. व्यापारीवर्ग येत नव्हता. अशा खडतर परिस्थितीला शेतकरीवर्गाला तोंड द्यावे लागले. त्यामध्ये एवढा माल शिल्लक राहिला की त्याला बेदाणा निर्मितीसाठीसुद्धा कोणी खरेदी करीत नव्हते. त्यामुळे दिंडोरी तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला आला होता. परंतु यंदा मात्र द्राक्ष पिकांसाठीचे वातावरण चांगल्या स्वरूपाचे असल्याने यंदा द्राक्षांची निर्यात चांगली होईल, अशी अपेक्षा शेतकरी व निर्यातदार यांना वाटू लागली आहे.
मागील हंगामातील जानेवारी २०२० पर्यंतची निर्यात
नेदरलँड - २३८ कंटेनर, ३१६० मे.टन
जर्मनी - ६४ कंटेनर, ८३० मे.टन
युनाइटेड किंग्डम - ३० कंटेनर, ३९२ मे.टन
डेन्मार्क - ६ कंटेनर, ७४ मे.टन
फिनलँड - ४ कंटेनर, ५० मे.टन
लिथुनिया - ३ कंटेनर, ४७ मे.टन
स्पेन- २ कंटेनर, २४ मे.टन
फ्रान्स- १ कंटेनर, १४ मे.टन
इटली - १ कंटेनर, १३ मे.टन
सोलवेनिया- ७ कंटेनर, ९३ मे.टन