न्यायडोंगरी प्राथमिक आरोग्य केंद्राला परिसरात अनेक गावे जोडले आहेत. साधारण १० ते १२ किलोमीटर अंतरावरील ही गावे आहेत. उपचारासाठी त्यांना न्यायडोंगरी येथे यावे लागते. कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असताना आरोग्य प्रशासनाला लसीकरणासाठी जनजागृती करावी लागली होती. त्यास नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी गर्दी जमू लागली होती. उपलब्धतेनुसार नागरिकांना लस देण्यात येत होती; परंतु गेल्या आठ दिवसांपासून लस नसल्याने नागरिकांना रोजच निराश होऊन घरी परतावे लागत आहे. रोजच उद्या येऊन बघा असे उत्तर मिळत असल्याने नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. काठे यांच्याशी संपर्क साधल्यावर तालुक्यातून लस आमच्यापर्यंत मिळत नसून केव्हा उपलब्ध होईल, तेदेखील सांगितले जात नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. या आरोग्य केंद्रावर तत्काळ लसीचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
न्यायडोंगरीत लसीकरण ठप्प; नागरिकांत तीव्र नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 4:16 AM