अझहर शेख नाशिकजिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाकडूनही नायलॉन मांजावर शहरासह जिल्ह्यात बंदी जाहीर करण्यात आली आहे; मात्र शहरात अद्यापही काही भागांमध्ये चोरट्या पद्धतीने नायलॉन मांजा उपलब्ध करून दिला जात आहे. परिणामी नायलॉन मांजारूपी पक्ष्यांवर ‘संक्रांत’ आली आहे. नायलॉन मांजा लवकर कुजत नसल्यामुळे ज्या झाडांवर हा मांजा लटकलेला असतो त्याचा फास वर्षभर पक्ष्यांना सहन करावा लागतो. त्यामुळे निसर्गाचा खरा दागिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पक्ष्यांचे अस्तित्वच धोक्यात येऊ लागले आहे.नायलॉन मांजामुळे पक्ष्यांसह मानवालादेखील धोका आहे. कारण अनावधानाने दुचाकीस्वार किंवा पादचाऱ्यांच्या गळ्याला नायलॉन मांजा अडकू न जखमी होण्याच्या घटना घडतात. नागरिकांनी विशेषत: तरुणाईने मानवी संवेदना जागृत ठेवून नायलॉन मांजाचा वापर स्वयंस्फूर्तीने टाळून माणुसकी जोपासण्याची गरज असल्याचे पर्यावरणप्रेमींची म्हणणे आहे.अवघ्या दोन दिवसांवर मकर संक्रात येऊन ठेपल्यामुळे बाजारपेठ पतंग-मांजा विक्रीच्या दुकानांनी सजली आहे. तरुणाईकडून मोठ्या प्रमाणात पतंगोत्सवाचा आनंद लुटला जात असल्याचे आकाशात उडणाऱ्या पतंगच्या संख्येवरून लक्षात येते. पतंगोत्सव साजरा करताना नायलॉन मांजाचा वापर नागरिकांनी स्वत:हून टाळणे गरजेचे आहे. जेणेकरून पक्ष्यांवर वर्षभरासाठी येणारी संक्रांत टाळणे शक्य होईल. झाड हे पक्ष्यांचे हक्काचे निवासस्थान जरी असले तरी मानवाच्या घटकाभराची हौस या निवासस्थानांनादेखील असुरक्षित बनवत आहे. पतंग कापल्यानंतर नायलॉन मांजा तुटून झाडांवर जाऊन अडकतो आणि दीर्घकाळापर्यंत ‘जैसे-थे’ राहतो. त्यामुळे पक्ष्यांवर कायमचीच संक्रांत येते.
पक्ष्यांवर नायलॉन मांजाची ‘संक्रांत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2016 12:08 AM