पंचवटी : शहरासह जिल्ह्यात नायलॉन मांजावर बंदी घोषित करण्यात आली आहे. तरीदेखील चोरीछुप्या पद्धतीने याची शहरात विक्री करण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रारी वाढल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत शहरात मागील काही दिवसांपासून पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाला यामध्ये मोठे यश आले असून, शहरातील महत्त्वाचा पुरवठादार मानला जाणारा दिलीप पतंगवाला याने नायलॉन मांजाचा मोठा साठा करून ठेवला होता. हा साठा पथकाने धाड टाकून जप्त केला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर होणारी नायलॉन मांजाची विक्री व वापराबाबत पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सर्वच पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेला कुणकुण लागली होती. नायलॉन मांजाचा मोठा बॉक्स घेऊन एक विक्रेता रविवार कारंजा भागातून जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली साध्या वेशातील पोलिसांनी सापळा शनिवारी (दि. १२) रचला.संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अॅक्सेस मोपेड दुचाकीवरून (एमएच १५ ईझेड ६३८१) संशयित दिलीप पांडुरंग सोनवणे हा नायलॉन मांजाचा बॉक्स घेऊन जात असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेत कसोशीने त्याची चौकशी केली व झडती घेत त्याच्याजवळील बॉक्स जप्त केला. तसेच नायलॉन मांजाचा गुप्त साठा कोठे असल्याची माहिती घेत वाघ यांच्यासमवेत वसंत पांडव, आसिफ तांबोळी, स्वप्नील जुंदे्र आदींनी त्याठिकाणी धाड टाकली. दिल्ली येथून मागविण्यात आलेल्या नायलॉन मांजाचे ३०० गट्टू पोलिसांनी गुदामातून हस्तगत केले आहे.या साठ्याची एकूण किंमत अंदाजे दोन लाख २२ हजार रुपये इतकी आहे. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व नायलॉन मांजाचा साठा असा एकूण पावणेतीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सोनवणे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.शहरात ठिकठिकाणी होणार होता पुरवठापोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्वच पोलीस ठाण्यांनी नायलॉन मांजावर ‘डोळा’ ठेवला असला तरी चोरीछुप्या पद्धतीने विक्रेत्यांकडून नायलॉन मांजाची मागणी मोठ्या पुरवठादारांकडे होत आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे नायलॉन मांजाला मोठा ‘भाव’ काळ्या बाजारात आला आहे. यामुळे या साठ्याच्या आधारे शहरात विविध ठिकाणी पुरवठा केला जाणार होता; मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा ‘डाव’ उधळला गेला.
नायलॉन मांजाचा साठा उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:55 AM
शहरासह जिल्ह्यात नायलॉन मांजावर बंदी घोषित करण्यात आली आहे. तरीदेखील चोरीछुप्या पद्धतीने याची शहरात विक्री करण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रारी वाढल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत शहरात मागील काही दिवसांपासून पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे.
ठळक मुद्देगुन्हे शाखा युनिट-१ : दोन लाखांचे तीनशे गट्टू जप्त