‘...ऐ मौत तुने मुझे जमींदार कर दिया’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 05:34 PM2020-08-12T17:34:51+5:302020-08-12T17:42:51+5:30
त्यांच्या निधनाने सोशलमिडियाही गहिवरला असून नेटिझन्सकडून इंदोरी यांना श्रध्दांजली अर्पण करत त्यांचे विविध शायरी सचित्र पोस्ट करण्यात आली.
नाशिक : दो गज जमी ही सही, ये मेरी मिलकीयत तो हैं, ए मौत, तुने मुझे जमींदार कर दिया...!
मैं जब मर जाऊं, तो मेरी अलग पहचान लिख देना, लहु से मेरी पेशानी पें हिन्दुस्तान लिख देना...!
अब ना मैं हुं, ना बाकी हैं जमाने मेरे फिर भी मशहूर हैं शहरो मे फसाने मेरे...! अशा एकापेक्षा एक सरस उर्दू शेरोशायरीची आगळीवेगळी कला आत्मसात असलेले देशाचे श्रेष्ठ शायर व गीतकार डॉ. राहत रफ्तुल्लाह कुरैशी उर्फ इंदौरी (७०) यांचे मंगळवारी (दि.११) संध्याकाळी अचानकपणे निधन झाल्याची वार्ता आली आणि सर्वत्र शोककळा पसरली. शहरातील उर्दूप्रेमींसह इंदौरी यांच्या चाहत्यांनी कधी न भरून येणारी हानी झाली असे म्हटले आहे.
वर्तमानस्थितीवर विशेष करून रचना सादर करणारे राहत यांचा चाहतावर्ग मोठा आहे. ते सुरूवातीला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरीला होते; मात्र त्यांना शायरी स्वस्थ बसू देत नव्हती. कालंतराने ते मुशायऱ्यांकडे वळले आणि भारताचे मोठे शायर म्हणून नावारूपाला आले. देशासह परदेशांमध्येही त्यांची ख्याती पसरली होती. त्यांच्या निधनाने सोशलमिडियाही गहिवरला असून नेटिझन्सकडून इंदोरी यांना श्रध्दांजली अर्पण करत त्यांचे विविध शायरी सचित्र पोस्ट करण्यात आली.
इंदौरी हे एक सुप्रसिध्द उर्दू कवी होते. त्यांनी गझल सादर करण्याची एक वेगळी शैली, देहबोली आत्मसात केलेली होती. त्यांच्या निधनाने उर्दू साहित्यक्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. ते वर्तमानावर परखडपणे शायरी करणारे शायर होते. - नासिर शकेब, ज्येष्ठ शायर, नाशिक
राहतसाहेबांची गझल सादर करण्याची अदा सगळ्यात श्रेष्ठ होती. शायरीच्या सादरीकरणाची अफलातून कला त्यांच्याकडे उपजत होती. मागील पन्नास वर्षांमध्ये अशाप्रकारची कला कोणत्याही शायरकडे पहावयास मिळाली नाही. प्रखर देशभक्तीपर शायरी इंदोरी साहेबांनी लिहीलेली आहे. राहत साहेबांच्या निधनाने उर्दू साहित्यक्षेत्राची मोठी हानी झाली आहे. -अॅड. नंदकिशोर भुतडा, उर्दूप्रेमी
उर्दू साहित्याच्या सेवेत इंदोरी साहेबांनी संपुर्ण आयुष्य वेचले. त्यांच्या आवाजात एक जादू होती ती, मुशायºयात सहज दिसून येत असे. त्यांचे भारतावरील प्रेम देशभक्तीपर शायरीतून दिसून येते. ‘कभी-कभी तो कोई मौत को तरसता हैं, किसी-किसीको अचानक खुदा बुलाता हैं...’ - इरशाद वसीम, शायर
राहत साहेब मुशाय-याचे ‘बादशाह’ होते. त्यांच्या निधनाने मोठी हानी झाली. त्यांनी नेहमीच निरपेक्ष व निडर होऊन आपले विचार शायरीद्वारे जनतेपर्यंत पोहोचविले. त्यांची मागील चाळीस वर्षांपासून शायरीच्या मंचावर सत्ता होती. त्यांच्या शायरीद्वारे ते नेहमीच आठवणीत राहतील. त्यांनी आपले उभे आयुष्य उर्दू शायरीला दिले.
-रईसा खुमार, शायर, नाशिक