लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : केंद्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या जनगणनेत ओबीसींचीदेखील जातनिहाय जनगणना करण्यात यावी यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक लाख दोन हजार २१ पत्रे पाठविण्याचा ठराव शुक्रवारी(दि.६) नाशिक येथे झालेल्या समता परिषदेच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठकीत करण्यात आला.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत ओबीसींची जातनिहाय करण्यासाठी ‘ओबीसी जातनिहाय जनगणना जनजागृती’ अभियानास नाशिक येथून सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानातून राज्यात तसेच देशभरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेबाबत जनजागृती करण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी १ लाख दोन हजार २१ पत्र पाठविण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला असून, या पत्रव्यवहाराला सुरुवात करण्यात आली आहे. बैठकीस समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी घाडगे, बाळासाहेब कर्डक आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी देशभरात ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात येऊन त्यांना हक्क मिळावा. यासाठी शासनाने ओबीसी समाजाच्या मागणीचा विचार करून ओबीसींची जनगणना करावी अन्यथा प्रसंगी तीव्र स्वरुपात लढा उभारला जाईल असा सूर उमटला. या बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील जिल्हा, शहर व तालुका कार्यकारिणीचा जिल्हानिहाय संघटनात्मक आढावा घेण्यात आला. बैठकीस नाशिक जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, समाधान जेजूरकर, राजेश बागुल, संतोष डोमे, नागेश गवळी, राजेंद्र वाघ, संतोष सोनपसारे, सतीश महाले, मोहन शेलार, अनिल नळे, संतोष पुंड, अरुण थोरात, शंकर मोकळ, योगेश कमोद, भालचंद्र भुजबळ, धीरज बच्छाव, सागर एंडाईत आदी उपस्थित होते.