नांदगाव : दुष्काळी स्थितीमुळे अन्नपाण्याच्या शोधात असलेल्या एका माकडाचा नांदगाव-मनमाडरोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. यावेळी हिसवळ खुर्दच्या ग्रामस्थांनी मृत माकडाचा विधीवत अंत्यविधी करत माणसातल्या संवेदना आणि भूतदया जिवंत असल्याचे दाखवून दिले.जंगल तोडीमुळे बिबटे जसे गावाकडे येऊ लागले तसे भीषण दुष्काळाने जंगलातली माकडे गावाकडे येऊ लागली आहेत. हिसवळ खुर्द येथे गावात पाच माकडे अन्न पाण्याच्या शोधात आली मात्र धावत्या यांत्रिक नागरी जीवनशैलीशी अपरिचित असल्याने त्यातले एक माकड रस्ता ओलांडताना भरधाव जाणा-या अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेने जागीच ठार झाले. नांदगांव मनमाड रोडवर हि घटना घडली. याची माहीती वनविभागाला देण्यात आल्यानंतर तत्काळ वनपाल बी.जे. सुर्यवंशी यांनी धाव घेत मृत माकडाचा पंचनामा केला. दरम्यान हिसवळ खुर्द च्या ग्रामस्थांची मृत माकडाचा अंत्यविधी करू देण्याची मागणी त्यांनी मान्य केली. लगोलग भजनी मंडळी आली व रामनामचा गजर करून माकडाच्या अंगावर नवा कपडा टाकून त्याची विधीवत पूजा करु न अंत्यविधी करण्यात आला. यावेळी बापू पल्हाळ यांनी माकडाला मांडी देऊन ग्रामीण भागात माणुसकी व प्राण्यांप्रतीही संवेदना टिकून असल्याचे उदाहरण दाखवून दिले. शुकदेव बिन्नर, विजय आहेर, बाळासाहेब आहेर, भास्कर आहेर, रावसाहेब आहेर, शिवाजी आहेर, रामचंद्र आहेर, दिपक आहेर, विजय अरणे आदींनी यावेळी अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला. नांदगांव मनमाड रोडवर चारा पाण्याच्या शोधात रस्ता ओलांडताना तीन महिन्यात सात हरणांचा अपघाती मृत्यु झाला आहे.
अपघाती मृत्यू झालेल्या माकडाचा अंत्यविधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 4:24 PM
हिसवळ खुर्द : ग्रामस्थांनी दाखविली प्राण्यांप्रती संवेदना
ठळक मुद्देनांदगांव मनमाड रोडवर चारा पाण्याच्या शोधात रस्ता ओलांडताना तीन महिन्यात सात हरणांचा अपघाती मृत्यु झाला आहे.