गतवर्षी केंद्र सरकारकडून मनमाड-इगतपुरी नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी येथील शेतकऱ्यांना नोटिसा प्राप्त झाल्यानंतर भूसंपादनास शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध झाला होता. याबाबत शेतकऱ्यांमध्ये अजूनही नाराजीचे सूर उमटत असतानाच गेल्या १५ जून रोजी राज्य शासनाने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग (राज्यमार्ग विशेष -२) साठी पूर्व भागातील जमिनी संपादित करण्याची जारी केलेली अधिसूचना इगतपुरी-त्रयंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तथा भूमि संपादन अधिकारी तेजस चव्हाण यांनी प्रसिद्धीमाध्यमात प्रकाशित केली आहे. त्यानुसार आजपासून २१ दिवसांच्या आत संपादित केल्या जाणाऱ्या शेतजमीन मालकाकडून स्वीकारल्या जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून अनेक तर्क वितर्क व्यक्त केले जात आहे. याबाबत अनेक शेतकरी भूमिहीन होणार असल्याने त्यांनी शासनाच्या या जुलमी भूसंपादन प्रक्रियेस जोरदार विरोध करणार असल्याचे सांगितले आहे.
इगतपुरी तालुक्यातील जवळपास ९० टक्के जमिनीपैकी ५४ हजार हेक्टर जमिनी याआधीच शासनाने विविध प्रकल्पांसाठी संपादित केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एकीकडे शासनस्तरावर शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या उपाययोजना अंमलात आणल्या जात असतांना दुसरीकडे शासन याच शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा घाट घालत असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. व्हिटीसी फाटा ते साकूर हा रस्ता मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या जोड रस्त्याच्या कामासाठी ज्यांचे १६३ गट जाणार आहेत. त्या जमिनीचे भाव गगनाला भिडलेले असल्यामुळे आपापल्या शेतजमिनी संबंधित शेत मालक जमीन संपादनाच्या विरोधात आहेत. जर शासन बळजबरीने संपादन करणार असेल तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा साकूर येथील शेतकरी तुकाराम सहाणे यांनी दिला आहे.
"प्राथमिक माहितीनुसार २५० कोटी रुपयांचा हा समृद्धी महामार्गाला जोडणारा रस्ता आहे. या बांधकामावर १६२.७ कोटी रुपये खर्च होणार असून, उर्वरित खर्च भूसंपादनावर होणार आहे. या रस्त्यावर ४ मोठे पूल, ३ लहान पूल, तर ३७ पाइप मोऱ्या असून, दोन मोठे व १५ लहान चौक असणार आहे. या रस्त्यासाठी ४०.७३ हेक्टर जमिनीची गरज असून, पैकी २३.१३ हेक्टर जमीन उपलब्ध असून, १७.६० हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. या रस्त्यामुळे घोटी-सिन्नर, नाशिक-मुंबई तसेच समृद्धी महामार्ग हे तीन महामार्ग एकमेकांना जोडले जाणार आहेत.
इन्फो...
गावनिहाय संपादित केले जाणारे गट
गावे गटांची संख्या
नांदूरवैद्य - ३२
बेलगाव कुऱ्हे -२४
गोंदे दुमाला - १०
वाडिवऱ्हे - ०३
कुऱ्हेगाव - ०२
साकूर - ६९
कोट...
आज साकूर ते व्हिटीसी फाटा दरम्यान होणाऱ्या समृद्धी महामार्ग जोडरस्त्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करणार असून, या जमिनींचे दर गगनाला भिडले आहेत. सदर जमिनी प्रकल्पांसाठी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध कायम असून, शासनाने जबरदस्तीने शेतकऱ्यांकडून जमिनी संपादित केल्यास परिसरातील शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध केला जाऊन प्रसंगी आंदोलन केले जाईल.
- तुकाराम सहाणे, शेतकरी, साकूर
कोट...
सदर जमिनीत दारणा धरणाच्या पायथ्याशी मुलाचे छोटेसे हाॅटेल असून, दुसऱ्या ठिकाणी एसएमबीटी हॉस्पिटलला भाडेतत्त्वावर जमीन दिलेली आहे. या दोन जमिनींवर उदरनिर्वाह चालत असल्यामुळे जर ही शेवटची शिल्लक राहिलेली जमीनच अधिग्रहित होणार असल्यावर जगायचे कसे? असा प्रश्न उभा टाकला आहे.
- किसन सहाणे, माजी सैनिक, साकूर
फोटो - २५ समृद्धी
250721\25nsk_10_25072021_13.jpg
समृद्धी महामार्ग