येवला : स्वच्छ भारत अभियानअंतर्गत येवले नगर परिषद राबवित असलेल्या साडेचार कोटीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची सर्वंकष चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे शिवसेना शहर संघटक राहुल लोणारी, दीपक भदाणे यांनी केली आहे.निवेदनात येवला नगर परिषदेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर वित्तीय आकृतिबंधानुसार करण्यात आला आहे काय, निधी वितरित करताना दिलेल्या सूचनेनुसार प्रकल्पासाठी प्राप्त निधी शासनाच्या प्रचलित धोरणानुसार विहीत केलेल्या बँकांमध्ये स्वतंत्र खाते उघडून ठेवणे अनिवार्य करण्यात आले होते.
त्यानुसार योग्य खाते उघडून योग्य कारणासाठीच सदरचा निधी खर्च करण्यात आला काय, सदर प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनाव्यतिरिक्त उर्वरित निधी येवले नगरपरिषदेने उभारणे बंधनकारक होते. त्यानुसार निधी उभारून केंद्र व राज्य शासनाच्या हिश्शाच्या प्रमाणात नगरपरिषदेने खर्च केला आहे काय, आदीसह अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या साऱ्या प्रकरणाचे लेखा परीक्षण करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.