पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकावर संशयित संतोष याने बुधवारी (दि.२३) सायंकाळी संपर्क साधला होता. फोनवरून बोलताना त्याने समोरील महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत अश्लील भाषेत संवाद साधला आणि शिवीगाळ करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे पीडित महिला पोलिसाने सरकारवाडा पोलिसांकडे फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांनी गंभीर दखल घेत या अज्ञात संशयिताचा तपास करत बेड्या ठोकण्याचे आदेश गुन्हे शाेध पथकाला दिले. कुठल्याही प्रकारची माहिती नसताना केवळ मोबाइल क्रमांकाच्या अधारे पोलिसांनी त्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू केला. त्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला; मात्र त्याने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याचा ठावठिकाणा शाेधणे कठीण होत होते. तांत्रिक विश्लेषण शाखेच्या मदतीने मोबाइल लोकेशनवरून त्याचा माग काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. त्यावेळी पाथर्डीतील एका इमारतीत सुरक्षारक्षक म्हणून संतोष काम करत असल्याचे समोर आले. त्याचे घर, कुटुंब काहीच नसल्याचे चौकशीतून पुढे आले असून, तो फिरस्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध सरकारवाडा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘कंट्रोल रुम’मध्ये फोनवरून साधला अश्लील संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 4:11 AM