नाशिक : मान्सूनच्या गतिमान वाटचालीस अनुकूल अशी स्थिती अरबी समुद्रात निर्माण होत असल्याने येत्या काही तासात उत्तर-मध्य महाराष्ट्रात पाऊस जोर धरणार असल्याचा इशारा कुलाबा येथील वेधशाळेकडून देण्यात आला आहे. दरम्यान, रविवारी शहरात संध्याकाळी तासाभरात २.५ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद पेठरोडवरील हवामान केंद्राकडून करण्यात आली.
मुंबई, कोकणात मुसळधार पाऊस सुरु असून उत्तर-मध्य महाराष्ट्राला मात्र अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. रविवारी दुपारनंतर शहरात ढगाळ हवामान तयार झाले. साडेचार वाजेच्या सुमारास शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही पावसाच्या मध्यम सरींचा वर्षाव सुरु झाला. साधारणत: सहा वाजेपर्यंत पाऊस सुरु होता. या दीड ते पावणे दोन तासांत २.५ मिमी इतका पाऊस पडला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पावसाने उघडीप दिली होती.
नाशिकसह सर्वच जिल्हे अद्यापही तहानलेले आहे. पावसाने ओढ दिल्याने बळीराजासह सर्वच चिंतेत सापडले आहे. शहरात जोरदार पाऊस होत नसल्याने गंगापूर धरणाचा जलसाठाही आटत असून महापालिका प्रशासनाने आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णयही घेतला आहे. यामुळे आता जुलैच्या उर्वरित दहा ते बारा दिवसांत सर्वदूर जोरदार पावसाची अपेक्षा नाशिककरांकडून केली जात आहे.