रवींद्र मालुंजकर
आपली व्यथा, भावना, भूमिका परखडपणे मांडून सर्वसामान्य जनतेला गायन मेजवानी, नृत्य मेजवानी, विचारांची मेजवानी देत आपल्या अंगी असणाऱ्या कलेला सर्वांसमोर सादर करून लोकांची ‘वाहवा’सारखी शाबासकी मिळाली तरच कलावंतांना उभारी मिळते. प्रत्येकाच्या आयुष्याचा पूर्वार्ध घडविणारी आणि आयुष्याचा उत्तरार्ध सुखीसंपन्न करणारी सांस्कृतिक क्षेत्राची भरारी स्थानिक संस्था, महनीय व्यक्तिमत्त्वांनी मदत केल्याशिवाय घेतली जाणार नाही, असे आवर्जून वाटते.प्रत्येक गाव किंवा शहराला स्वत:चा एक स्वतंत्र चेहरा असतो. या चेहºयामध्ये प्रत्येक व्यक्ती स्वत:चं वेगळ रूपडं शोधत राहतो. सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या तुम्ही जसे प्रगल्भ होतात, तसेच तुमच्यातील सांस्कृतिक जाणिवाही समृद्ध असल्यास वर्तमानकाळासह भविष्यकाळही सुदृढ आणि संपन्न होत असतो. आपलं नाशिकरोडही याला अपवाद नाही. पूर्वीपासून सर्वधर्मसमभाव बिजे रोवणाºया अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांनी अनेकांचे जीवन फुलले, बहरले. इथले सांस्कृतिक मेळे, गायन मैफली, लोकनाट्ये-पथनाट्ये, महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीदरम्यान होणारे सदाबहार कार्यक्रम यांनी अनेकांच्या अंगी असलेल्या कलागुणांना हक्काचं व्यासपीठ दिलं. आताच्या काळात मात्र या कार्यक्रमांना अवकळा आली आहे. हे असे का घडले, याचा शोध घेण्याचीही गरज आज निर्माण झाली आहे.सांस्कृतिक-साहित्यिक क्षेत्रातील लेखक-कलावंतांची फार मोठी परंपरा परिसराला लाभली आहे. पूर्वी गणेशोत्सव-नवरात्रोत्सवात होणारे मेळे, म्हसोबा यात्रेनिमित्त होणारे तमाशे, लोकनाट्यं आणि गावोगावी होणारे यात्रोत्सव यातून बाहेरील कलाकारांसह स्थानिक कलावंतांची अदाकारी रसिकांना मंत्रमुग्ध करीत काही कलावंतांची उदरनिर्वाहाची गरजही याद्वारे भागविली जायची. आज मात्र या कलांकडे पाहण्याचा समाजाचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा दृष्टिकोनही काहीसा दुर्लक्षित झाला आहे. जगण्याच्या लढाईत जो-तो केवळ आर्थिक उन्नतीच्या मागे पळत असल्याने लोककलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे.चित्रनगरी, नाट्यगृह या कलावंतांच्या मागण्या तर अनास्थेपोटी केवळ कागदावरच राहिल्या आहेत. महानगरपालिकेने उभारलेली समाजमंदिरं केवळ लग्नकार्यासाठीच वापरली जाताहेत. इतकंच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी बांधलेली विरंगुळा केंद्रेही केवळ शोभेच्या वास्तू ठरल्या आहेत. राजकीयदृष्ट्या जागरूक असणाऱ्यांनी स्थानिक कलावंतांसाठी हक्काची ठिकाणं विशेषत: ओपन स्पेस, खुले रंगमंच निर्माण करण्याची गरज आहे.निवडणुका आल्या की, सांस्कृतिक कार्यक्रमांना भरती येते. त्यातही भरमसाठ पैसा खर्च करून ‘सेलिब्रिटी’ आणून गर्दी खेचायचा कार्यक्रम होतो. इतर वेळेस मात्र सगळाच आनंदीआनंद. व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटरच्या जमान्यात कला आणि कलावंतांकडे पाहण्याची दृष्टीही समाजाची बदलली आहे. त्यामुळे नवे लिहू पाहणारे, कला जोपासू पाहणारे पुढे कसे येणार? हा प्रश्न सतावत आहे.यासाठी गायन, नाट्य, वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभागी होणारे कलावंत-लेखक कसे घडतील? याकडे सजगपणे पाहण्याची आवश्यकता आहे. विविध वाहिन्यांवर होणाºया रिअॅलिटी शोमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून नाशिकरोड परिसरातील एकही कलावंत का दिसत नाही, याचा विचार करून भविष्यात जर परिसराचे नाव राज्य, देश, आंतरराष्टÑीय पातळीवर न्यायचे असेल तर परिसरातील सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाºया संस्थांनी याबद्दल प्रामुख्याने विचार करावा, असे वाटते.आपली व्यथा, भावना, भूमिका परखडपणे मांडून सर्वसामान्य जनतेला गायन मेजवानी, नृत्य मेजवानी, विचारांची मेजवानी देत आपल्या अंगी असणाºया कलेला सर्वांसमोर सादर करून लोकांची ‘वाहवा’सारखी शाबासकी मिळाली तरच कलावंतांना उभारी मिळते.‘संगीत देवबाभळी’सारखी वेगळी नाट्यकृती निर्माण करून नाशिकरोडचा युवा रंगकर्मी प्राजक्त देशमुख राज्य नाट्य स्पर्धेत आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून सहभाग घेत नाट्यरसिकांची दाद मिळविणारे परिसरातील डॉक्टर्स, वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची शृंखला सादर करणारी महाराष्टÑ साहित्य परिषदेची नाशिकरोड शाखा, दरमहा गायन-वाद्याची मेजवानी देणारे पं. शंकरराव वैरागकर संगीत प्रतिष्ठान, व्यापारी बॅँकेच्या वतीने आणि संत गजानन महाराज ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने होणारीवसंत व्याख्यानमाला ही सांस्कृतिक बेटे जगवायची असतील तर कायमस्वरूपी उपाययोजना आखण्याची गरज आहे.