नाशिक : लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे आधार रेशन कार्डाला अपडेशन करताना बायोमेट्रिकच्या अडचणी येत असल्याने अजूनही रेशन कार्डांचे अपडेशन पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे या उपक्रमाला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आधार लिकिंग करण्याची मुदत तिसऱ्यांदा वाढविण्यात आली असून आता गुरुवार (दि.१५) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
रेशन कार्डाला आधार व मोबाइल क्रमांक लिंक करण्यासाठी शासनाने येत्या १० तारखेपर्यंत मुदतवाढ दिलेली होती. यापूर्वी ही मुदत ३१ जानेवारी अशी देण्यात आली होती. आतापर्यंत ५५ हजार कार्डधारकांनी आधार लिकिंग केलेले आहे. मात्र, लहान मुले आणि आणि वयोवृद्धांच्या हाताचे ठसे बदलत असल्याने आधार लिकिंग करण्यास अडचणी येत आहेत. यामुळे अनेकांना पुन्हा एकदा आधार कार्ड केंद्रावर जाऊन नव्याने आधार कार्ड अपग्रेड करावे लागत आहे. लहानपणी काढलेले आधार कार्ड तसेच वयोवृद्धांच्या बोटांचे ठसे बदलल्याने अडचणी येत असल्याचे समोर आले आहे.
गरजू आणि गरीब लाभार्थ्यांनाच धान्याचा पुरवठा व्हावा यासाठी पुरवठा विभागाने रेशन कार्ड संगणकीकृत करण्याची मोहीम सुरू केली आहे. दरवर्षी ही मोहीम राबविली जाते
जिल्ह्यात १ लाख ३४ हजार अंत्योदय कार्डधारक आहेत. आठ लाख ५० हजार प्राधान्य कुटुंबातील कार्डधारक आहेत. यापैकी ९८ टक्के कार्डधारकांचे आधार लिकिंग झाले आहे. आधार लिकिंग झाल्याशिवाय धान्यपुरवठा करता येणार नसल्यामुळे आधार लिकिंगची धावपळ वाढलेली आहे.
जिल्ह्यात सुमारे अडीच हजार रेशनदुकानदार असून दुकानांमधून रेशन कार्ड आधार व मोबाइल क्रमांकाशी लिंक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या कार्डधारकांचे अद्याप लिकिंग झालेले नाही त्यांनी आपल्या रेशन दुकानांमध्ये जाऊन आधार रेशन कार्डाला लिंक करावे, असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.
आधार लिकिंग पुरेसे झालेले नसल्याने आणि येणाऱ्या अडचणींमुळे कुणीही वंचित राहू नये यासाठी लिकिंग करण्यासाठीची मुदत पुन्हा एकदा वाढविण्यात आलेली आहे. कार्डधारकांनी रेशनदुकानांमध्ये जाऊन लिकिंगची प्रकिया पूर्ण करावी.
- अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी.