मुख्य रस्त्यावर अतिक्रमण
नाशिक : मेन रोड आणि एमजी रोड परिसरातील रस्त्यावर किरकोळ विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. काही दिवसापूर्वी महापालिका आणि पोलिसांनी या भागातील किरकोळ विक्रेत्यांना हटविले होते. परंतु, नूतन वर्षात कोरोनातून दिलासा मिळाल्यापासून पुन्हा या भागात किरकोळ विक्रेत्यांनी अतिक्रमण करून दुकाने लावण्यास सुरुवात केली आहे.
अनधिकृत फलकांनी शहराचे विद्रुपीकरण
नाशिक : शहरात विविध ठिकाणी अनधिकृत जाहिरातींचे फलक लावून विद्रुपीकरण केले जात आहे. शहरातील विविध भागात पोस्टर भित्तीपत्रके लावून विद्रुपीकरण होत असल्याने अशा अनधिकृत फलक, पोस्टरवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. रस्त्यावरील चौकात तसेच विजेच्या खांबांनादेखील या अनधिकृत फलकांनी वेढले आहे.
द्वारका उड्डाणपुलाखाली पार्किंग
नाशिक : द्वारका येथील उड्डाणपुलाखाली विविध खासगी ट्रॅव्हल्स आणि अन्य मालट्रक उभ्या केल्या जात असल्याने प्रशासनाने या वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच दोन्ही सर्व्हिस रोडवर गॅरेजची संख्या मोठी असल्याने त्यांची वाहने ही द्वारका उड्डाणपुलाखाली मोकळ्या जागेत उभी केली जात असून, सर्व्हिस रोडचीदेखील अडवणूक करण्यात आली आहे.
बदलत्या वातावरणामुळे अनेकांना घसादुखीचा त्रास
नाशिक: वातावरणातील उकाडा एकीकडे वाढत असताना सायंकाळच्या सुमारास जाणवणारी थंडी अशा विचित्र वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांना घसादुखीचा त्रास वाढत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे परिसरातील डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे. घसादुखीबरोबरच खोकल्याचे रुग्णदेखील वाढत आहेत.
डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त
नाशिक : शहरातील अनेक भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सायंकाळच्या वेळी नागरिकांना त्याचा अधिक त्रास सहन करावा लागतो. महापालिकेच्या धूर फवारणीच्या गाड्या केवळ काही विशिष्ट भागांमध्येच फिरत असतात. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून, महापालिकेने याबाबत दक्षता घेऊन जास्त लोकवस्ती असणाऱ्या भागांमध्ये फवारणीला प्राधान्य देण्याची मागणी केली जात आहे.