ओझर : येथील एचएएल प्रशासनाकडून ( सेक्युरिटी ) टाऊनशीप वसाहतीमध्ये जाणाऱ्या नागरिकांची एचएएल प्रवेशद्वारावर अडवणुक केली जात आहे, त्यामुळे पोलीसठाणे, पोस्ट ऑफिस, एसबीआय सह विविध बँका, गॅस वितरक आदी ठिकाणी जातांना ग्राहकांची गैरसोय होत आहे.
अत्यावश्यक सेवांसाठी वेगळा मार्ग करून द्यावा अशी मागणी वाढत आहे. आधिच दिपक शिरसाठच्या प्रकरणामुळे सुरक्षेच्या दृस्टीने मरिमाता गेट महामार्गावरील गावाकडील व कोकणगांवच्या बाजूचे गेट बंद आहेत. त्यामुळे सुकेणे दिक्षीकडे जाणाऱ्या दहा गावांचा वाहनधारकांसह शेतीमाल वाहून बाजारात नेण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. आता नागरिकांची कोंडी झाली आहे.ओझरटाऊनशीप मधील कोरोना रुग्णांचा आकडा सद्या वाढत आहे. याच गोष्टींवर आळा घालण्यासाठी सदर पद्धतीचे अवलंबन करत आहे. तसेच ज्यांच्याकडे काही ठोस कारण आहे आणि संबंधित कामाशी गरजेचे कागदपत्रे आहेत, अशा नागरिकांना आम्हीं आत मध्ये प्रवेश देत आहोत, असे एचएएल ह्यूमन रिलेशन अधिकारी अनिल वैद्य यांनी सांगितले.असे असले तरी यामध्ये सामान्य नागरिकांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून त्यांचा वेळ देखील वाया जात आहे.ओझरमधील टाऊनशीप वसाहत भागात स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल, आयसीआयसीआय बँक अशा राष्ट्रीयकृत बँक, पोलीस स्टेशन, शाळा, कॉलेज, पोस्ट ऑफिस, गॅस एजन्सी, इन्शुरन्स ऑफिस असे अनेक कार्यालय आहेत. ही सर्व कार्यालये अत्यावश्यक सेवेत आहेत, या कार्यालयात जाण्यासाठी ओझर पासून ५ -६ किलोमीटर ओझर गावातून जावे लागते,सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने बस सेवा, रिक्षा व अन्य प्रवासी वाहने बंद असल्याने नागरिकांना स्वतः चे वाहन घेऊन जावे लागते. यामध्ये जेष्ठ नागरिक व महिलांची खरी अडचण होते. या भागात शाळा, कॉलेज असल्याने विद्यार्थ्यांना जायचे असल्यास त्यांची ही अडवणूक होत आहे, मात्र तेथील मैदानात विविध खेळ चालू असतात .त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच शाळा कॉलेजचे देखील नुकसान होत आहे. या बाबतीत जि. प. सदस्य यतीन कदम यांनी एचएएल प्रशासनाशी बैठक घेऊन तोडगा काढला जाईल असे सांगितले. नागरिकांना अत्यावश्यक सेवेचा लाभ घेण्यासाठी जास्त वेळ न घेता त्यांना जाऊ द्यावे अशी मागणी स्थानिक नागरीकांकडून केली जात आहे.