पंचवटी : सिंंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने रामकुंडावर राबविलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका पिंडदान आणि अस्थि विसर्जनासाठी आलेल्या राज्यभरातील भाविकांनाही बसला. दशक्रिया विधीसाठी अमरावतीहून आलेल्या भाविकांच्या पूजाविधीत या मोहिमेची बाधा निर्माण झाल्याने भावना दुखावल्याची तक्रार संबंधितांनी पोलिसांकडे केली आहे. नाशिकच्या गोदावरी नदीला दक्षिण गंगा संबोधले जाते. त्यामुळे येथे रामकुंडावर अस्थि विसर्जन तसेच पिंडदान आदि विधी करण्यासाठी देशभरातून नागरिक येतात. त्यांच्यासाठी पुरोहित संघाने रामकुंडावर पत्र्याच्या निवाराशेडची व्यवस्था केली आहे. या शेडखालीच हे विधी पार पाडले जातात. सिंहस्थानिमित्त महापालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेने या निवाराशेडचेच अतिक्रमण हटविल्याने राज्यभरातून आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय झाली. यातच पिंडदानासाठी अमरावतीहून आलेल्या अनिल काबरा व कुटुंबीयांची पूजा विधी चालू असताना मोहीम राबविली गेल्याने त्यात व्यत्यय आला व साहित्य विस्कटले गेले. यावेळी लोखंडी पाइप पिंडदानावर पडल्याने भाविकांनी प्रशासनाच्या या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात काबरा यांनी स्थानिक पोलिसांना निवेदन देऊन महापालिकेच्या या कृतीमुळे आपल्या भावना दुखावल्याची तक्रार केली आहे. (वार्ताहर)
पिंडदान विधीत अतिक्रमण हटावची बाधा
By admin | Published: June 16, 2015 12:02 AM