संजय शहाणे/ आॅनलाइन लोकमत, नाशिक : वेळ सकाळी आठ वाजेची...जोरदार पाऊस सुरू...नाशिकमधील रविशंकर मार्गावर वाहतुक हळुहळु वेग धरत होती...पोटाची भूक भागविण्यासाठी वासराला पूढे घालून गोमाता कुरणाच्या दिशेने... एक भरधाव मोटार येते अन् वासराला धडक देते...गोमाता व्याकुळ होऊन कोसळलेल्या वासराभोवती घिरट्या घेते...मायेचा दिलासा देत आधार देते अन् वासरु मातृत्वाच्या करुणेची उर्जा घेऊन उठून उभे राहिले.नाशिकमधील वडाळागाव येथील महापालिकेच्या घरकुल प्रकल्पासमोर शंभर फूटी रस्त्यावर हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात गायीचे वासरू बचावले. ज्या वाहनचालकाने बेदरकारपणे वाहन चालवून दिवसाढवळ्या वासराला धडक दिली. त्या वाहनचालकाच्या ह्रदयाला मात्र पाझर फूटला नाही अन् माणूसकी ओशाळली... भरदिवसा वासराला ज्या वाहनचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करु न धडक दिली त्या वाहनचालकाने वाहन थांबविण्याचीही तसदी घेतली नाही. एक मुका जीव धडकेने कोसळून तडफडत असल्याचा विचारही त्याच्या मनात आला नाही. एक ‘माणूस’ असूनही त्याच्यामधील माणुसकी गहिवरली नाही.
परिसरातील काही नागरिकांनी व युवकांनी त्या मोटारीचा पाठलाग करण्याचा प्रयत्नही केला मात्र ते अपयशी ठरले. चिखलाने माखलेल्या मोटारीचा वाहन क्रमांकही त्यांना बघणे शक्य झाले नाही. त्यामुळे या वाहनचालकावर कारवाईचा प्रश्नही येत नाही; परंतू हे वृत्त वाचून तरी त्याने आत्मपरिक्षण करावे अन् वाहन चालविताना वेगमर्यादेचे पालन करत नियंत्रण ठेवावे, जेणेकरुन त्याचा अन् दुसºयाचा जीव धोक्यात येणार नाही, हीच एक माफक अपेक्षा.