नाशिक : शिवसेना सोडून तसे सुनील बागुल यांना अनेक वर्षे झाली, या पक्षातून राष्ट्रवादीत आणि तेथून भाजपात दाखल झाले, परंतु मूळ पक्ष कसा विसरता येणार? बहुधा यातूनच त्यांनी जुन्या शिवसैनिकांना मिसळ पार्टीसाठी आमंत्रित केले; परंतु त्यापेक्षा झणझणीत चर्चा झडली ती शिवसेनेवर! पूर्वीच्या शिवसेनेला उजाळा देण्यात आला खरा; परंतु आता पूर्वीचे दिवस राहिले नाही, हाच सूर राहिला.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने शिवसेनेत आलेली फळी अद्याप ना सेनेला विसरली, ना बाळासाहेबांना. त्यामुळे या पार्टीच्या अखेरीस शिवसेनाप्रमुखांचा जयजयकार करण्यात आला. बागुल आता भाजपात असून, प्रदेश उपाध्यक्ष आहेत. तरीही जुन्या काळातील मित्रत्व कायम आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी मखमलाबाद येथील एका हॉटेलमध्ये मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने शिवसेनेतील सुमारे दोनशे ते अडीचशे कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून अभूतपूर्व प्रतिसाद दिला. माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे, जयंत दिंडे, शोभा मगर, अॅड. शिवाजी सहाणे यांच्यापासून सध्याच्या शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख अॅड. श्यामला दीक्षित यांच्यापर्यंत अनेक जण यावेळी उपस्थित होते. बाळासाहेबांच्या आठवणींना खुद्द बागुल यांनीच उजाळा दिल्यानंतर साºयांनीच आपल्या आठवणी सांगितल्या. यानिमित्ताने जुन्या काळातील आठवणी सांगताना अनेकांचा ‘आता ते दिवस राहिले नाही’ असाच सूर होता. शिवाजी सहाणे यांनी विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पूर्वीचे निकष आणि आता उमेदवारीबाबत करण्यात आलेल्या चर्चा सांगितल्याचे समजते. बैठकीच्या निमित्ताने अनेकांनी अशाच प्रकारे वेळोवेळी भेटले पाहिजे, असे मत व्यक्त करतानाच दत्ता गायकवाड यांनी पुढील स्नेहमेळावा नाशिकरोड येथे आयोजित करण्याची तयारी दर्शविली.चर्चा मात्र वेगळी सुनील बागुल सध्या भाजपात प्रदेश कार्यकारिणीवर असताना त्यांना जुन्या पक्षाची आणि कार्यकर्त्यांची आठवण येणे काय दर्शविते? महापालिका निवडणुकीत त्यांचे शहर नेतृत्वाशी उडालेले खटके हे चर्चेत आहेत. त्यामुळे या मिसळ पार्टीमागील चर्चा मात्र वेगळीचहोत राहिली.