नाशिक: कोरोना संसर्गित रुग्णांच्या सान्निध्यात आलेल्या संशयित रुग्णांची तपासणी करणाऱ्या वैद्यकीय पथकावर होणारे हल्ले रोखण्यासाठी प्रसंगी पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला असून, ग्रामीण भागात ॲन्टिजन तपासणी वाढविण्यासाठी त्रिसूत्री कार्यक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आखला आहे.
कळवण तालुक्यातील काही गावांमध्ये कोरोना रुग्ण सापडल्याने वैद्यकीय पथक गावात गेले असता, त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी केला; तसेच कन्टेनमेंट झोन जाहीर करण्यास मज्जाव केल्याची घटना घडल्याने ग्रामीण भागातील वैद्यकीय पथक घाबरले आहे. मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांनी घेतलेल्या गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये हाच मुद्दा चर्चिला गेला. त्यामुळे ज्या गावात वैद्यकीय पथकाला विरोध होईल, तेथे प्रसंगी पोलीस मदत घेण्याचे ठरविण्यात आले. त्याच बरोबर गावोगावी ॲन्टिजन चाचणी वाढविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीची मदत घेण्याचे वा त्यांच्या पुढाकाराने मोहीम राबविण्याचे ठरले, जेणे करून विरोध होणार नाही. ग्रामीण भागातील रुग्णांचा शासकीय डॉक्टरपेक्षा त्यांचा खासगी डॉक्टरांवर अधिक विश्वास असतो, तो तसाच कायम राहावा म्हणून खासगी डॉक्टरांना ॲन्टिजन चाचणी करण्यासाठी गळ घालण्यात येणार आहे. त्यासाठी खासगी डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने संशयित रुग्णांना चाचणीसाठी प्रवृत्त करण्याचे ठरविण्यात आले आहे.
चौकट-------
प्रयोगशाळांना प्रशिक्षण
शासकीय रुग्णालयात न येता खासगी डॉक्टरकडे जाऊन उपचार घेणाऱ्या, लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी ग्रामीण भागातील खासगी प्रयोगशाळेत ॲन्टिजन चाचणी करण्याची परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय लीना बनसोड यांनी घेतला आहे. त्यासाठी ज्या खासगी प्रयोग शाळा चाचणीसाठी तयार होतील त्यांच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा तसेच त्यांना ॲन्टिजन किट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. सटाणा, पिंपळगाव बसवंत, दाभाडी या ठिकाणी प्रायोगिक पातळीवर मंगळवारपासून सुरुवात झाली आहे.