यंदा येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, मुखेड, देशमाने, जळगाव नेऊर आदी परिसरात चांगल्या पावसाच्या जोरावर हजारो हेक्टर जमिनीत मका पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. परंतु कोवळ्या मकाच्या पिकात लष्करी अळी रोपांचे शेंडे फस्त करत असल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. २०१८च्या दुष्काळाची पुनरावृत्ती लष्करी अळी पुन्हा निर्माण करते की काय अशी भिती शेतक-यांच्या मनात उपस्थित होत आहे. सध्या पावसाची रिपरिप सुरू असून ऐन झाडाच्या वाढीचा कालावधी असताना लष्करी अळीचे आक्र मण झाले आहे. यामुळे शेतकरी अस्मानी संकटाच्या साडेसातीने हतबल झाला असून पीक वाचविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. आर्द्राच्या पहिल्या दिवशी झालेल्या पावसानंतर शेतक-यांनी पेरणी केलेल्या मका पिकावर लष्करी अमेरिकन अळी आढळून आल्याने पीक उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे.लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी पीक पंधरा दिवसाचे असतांना पहिली औषधांची फवारणी करण्याचे आवाहन शेतक-यांना केले जात असून एक एकरला पंधराशे रु पये खर्च लागणार आहे. दुष्काळी स्थितीतून सावरून खरीपाच्या आशेवर जीवनमान सुधारण्यास सज्ज झालेला शेतकरी मका पिकापुढील या नव्या संकटाने खर्चाच्या खाईत लोटला जात आहे.
मुखेड, दत्तवाडी परिसरात मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 5:48 PM