वसंत तिवडे, लोकमत न्यूज नेटवर्क, त्र्यंबकेश्वर: उद्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी इगतपुरी त्र्यंबक विधान सभा मतदार संघातील सुमारे अडीच हजार निवडणूक कर्मचारी आज त्र्यंबक येथून आपल्याला नियुक्त केलेल्या गावांना रवाना झाले आहे. त्र्यंबक व इगतपुरी मिळुन २८९ मतदान केंद्रावर (एका मतदान केंद्रासाठी एका पोलिसासह सहा कर्मचारी) पथके रवाना झाली आहेत.
इगतपुरी त्र्यंबकसह सर्व मतदानयंत्र त्र्यंबकेश्वर येथील पोलीस विश्रांतीगृहात स्ट्राँगरुम मध्ये ठेवण्यात आली होती. इगतपुरी तालुक्यातील १५६ बुथवर तर त्र्यंबक तालुक्यातील १३३ बुथअशा एकूण २८९ बुथवर प्रत्येकी सहा कर्मचारी व 20 टक्के राखीव कर्मचारी मिळुन जवळपास २५०० कर्मचारी सज्ज झाले आहेत. येथील भव्य शामियान्यात निवडणुक कर्मचा-यांची गर्दी झाली होती. त्यांच्या दिमतीला पाण्याचा टँकर, फिरते टाॅयलेट, नाश्त्याची व्यवस्था, आपल्या केंद्रावर जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.
माईकवरून निवडणुक कर्मचा-यांना विविध सुचना दिल्या जात होत्या. सर्व काम अगदी नियोजनबध्द होते. इगतपुरीचे निवडणुक अधिकारी तथा प्रांताधिकारी सुधीर खांदे यांच्यासह निवडणुक अधिकारी व इगतपुरीचे तहसिलदार अजित बारवकर त्र्यंबकच्या तहसिलदार श्रीमती श्वेता संचेती यांनी नियोजन केले. तर इगतपुरीचे सहायक गटविकास पवार, त्र्यंबकचे गटविकास अधिकारी श्रीकिसन खातळे, त्र्यंबक नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डाॅ.श्रीया देवचके, इगतपुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज गोसावी आदी उपस्थित होते. दरम्यान निवडणुक निरीक्षकांनीही या केंद्राला भेट देऊन पाहणी केली व समाधान व्यक्त केले.