नाशक : सर्वोच्च न्यायालयाने दिवाळी सणाच्या काळात रात्री आठ ते दहा वाजेपर्यंतच सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास अनुमती दिलेली असताना छटपूजेनिमित्ताने पंचवटीतील इंद्रकुंड भागात मध्यरात्री उशिरा मोठ्या आवाजाचे फटाके फोडणा-या तरुणाविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशकात अशा प्रकारचा हा पहिलाच गुन्हा दाखल करण्यात आला असून, ऐन दिवाळीत चोवीस तास शहरात मोठ्या आवाजाचे फटाके फोडण्यात आल्यावर पोलिसांनी काहीच कारवाई केली नसल्याबद्दल सर्वत्र टीकेची झोड उठली असताना पोलिसांनी दिवाळीनंतर कारवाईचा बडगा उगारला आहे.याबाबत माहिती अशी की पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या आदेशानुसार पोलीस कर्मचारी हवालदार रवींद्र आढाव पोलीस वाहनातून पोलीस कर्मचा-यांसमवेत गंगाघाटावर रात्री एक वाजेच्या सुमारास गस्त घालत असताना साईबाबा मंदिराजवळ फटाके फोडण्याचा आवाज येत असल्याचे पाहून त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी एक युवक हातात पिशवी घेऊन पळू लागला, पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेत पिशवीची झडती घेतली असता त्यात फटाके ठेवलेले होते. सदर युवकाचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रतीक पांडे असे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री दहा वाजेनंतर फटाके फोडण्यास मनाई असताना तसेच फटाक्यांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे याची माहिती असतानाही नियमांची पायमल्ली केली म्हणून पंचवटी पोलीस ठाण्यात पांडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशकात मर्यादेनंतर फटाके फोडणाऱ्याविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 3:55 PM
नाशकात अशा प्रकारचा हा पहिलाच गुन्हा दाखल करण्यात आला असून, ऐन दिवाळीत चोवीस तास शहरात मोठ्या आवाजाचे फटाके फोडण्यात आल्यावर पोलिसांनी काहीच कारवाई केली नसल्याबद्दल सर्वत्र टीकेची झोड उठली असताना पोलिसांनी दिवाळीनंतर कारवाईचा बडगा उगारला आहे.
ठळक मुद्देनाशकात पहिलाच प्रकार : छटपूजेचे निमित्त