नाशिक : शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास द्वारकानाथ कांदे (रा़ काळेनगर, पाइपलाइनरोड, आनंदवली) यांनी बंदुकीचा धाक दाखवून गाळा बळकाविल्याची फिर्याद रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए)चे शहराध्यक्ष पवन क्षीरसागर यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात शनिवारी (दि़१५) दिली़ क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २७ नोव्हेंबर २००७ रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ते कॅनडा कॉर्नर बीएसएनएल कार्यालया-समोरील सिल्व्हर प्लाझा बिल्डिंग येथील सात नंबरच्या स्वत:च्या गाळ्यात बसलेले होते़ त्यावेळी सुहास कांदे यांनी बंदुकीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत कोऱ्या कागदावर तसेच काही हिरवे लेझर पेपरवर सह्या घेतल्या़ तसेच गाळ्याबाहेर काढून या गाळ्यास स्वत:चे कुलूप लावल्याचे म्हटले असून, सुमारे अकरा वर्षांनंतर हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़दरम्यान, केवळ बदनामी करण्याच्या उद्देशाने तसेच राजकीय आकसापोटी क्षीरसागर यांनी हा खोटा गुन्हा दाखल केल्याचे सुहास कांदे यांनी म्हटले आहे़ तसेच ज्या गाळ्याबाबत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचे साठेखत मूळ मालक राजू पनीकर याच्यासोबत २५ जानेवारी २००१, तर कब्जापावती ५ फेब्रुवारी २००१ रोजी झाली असून, पैसेही बँकखात्यातून देण्यात आले आहेत़ तांत्रिक कारणाने विश्वासू कामगार म्हणून कामास असलेल्या क्षीरसागर यांच्या नावावर खरेदी खत करण्यात आले होते़ मात्र, त्यानंतर १२ जुलै २००१ साली क्षीरसागर यांनी माझ्या लाभात या गाळ्याचे मुखत्यारपत्र करून दिल्याची कागदपत्रे सादर केली असल्याचे कांदे यांनी म्हटले आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख कांदे यांच्याविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 1:17 AM