नाशिक : नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र नामदेव जाधव (५७) यांच्याविरुद्ध ज्ञात स्रोतातून मिळालेल्या उत्पन्नापेक्षा ४६ लाख ८२ हजार इतकी अधिक अपसंपदा भ्रष्ट मार्गाने संपादित केल्याचे निष्पन्न झाल्याने पुण्यातील चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाधव यांच्या नाशिक जिल्ह्यातील चांदवड आणि नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील घरांचे झडती घेण्याचे काम सुरू केले आहे. पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदर कारवाई केली आहे. पुणे युनिटचे सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रेय भापकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.चांदवड, श्रीरामपूरला झडतीनाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्याविरुद्ध अपसंपदाप्रकरणी दाखल झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील त्यांच्या वडिलोपार्जित घराची तसेच नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील घराची झडती घेण्याचे काम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरू केले आहे. चांदवड येथील घराची झडती घेण्यासाठी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक पोहोचले असता, घर बंद स्थितीत आढळून आले. त्यामुळे पथकाने घराला सील ठोकले असून त्याठिकाणी स्थानिक पोलिसांचा पहारा लावला आहे. दरम्यान, येत्या ३१ जानेवारीला जाधव हे सेवानिवृत्त होत आहेत. निवृत्तीपूर्वी आठ दिवस अगोदर त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची नामुष्की ओढवली आहे.रामचंद्र जाधव हे पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रमुखपदी कार्यरत असताना त्यांच्याविरुद्ध अपसंपदा प्रकरणी तक्रार दाखल झालेली होती. त्यानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे युनिटने चौकशी सुरू केली.विभागाने १५ जून १९८५ ते ३१ मार्च २०१२ या कालावधीत जमविलेल्या संपत्तीची माहिती घेतली. मालमत्तेच्या उघड चौकशी दरम्यान जाधव यांच्या सेवेतील कालावधीत ज्ञात स्रोतातून मिळालेल्या उत्पन्नापेक्षा जादा उत्पन्न आढळले.चौकशीत ४६ लाख ८२ हजार ४०३ रुपये इतकी अधिक म्हणजे २३.५३ टक्के अधिक अपसंपदा भ्रष्ट मार्गाने संपादित केल्याचे निष्पन्न झाले. सहाय्यक पोलीस आयुक्त वर्षाराणी पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी केली. जाधव यांनी ४६ लाखांहून अधिक अपसंपदा संपादन केल्याने पुणे चंदननगर पोलिसात गुन्हा दाखल केला.
नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 1:29 AM