नाशिक : देशात सतराव्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीचा उत्साह संचारला असून, तसाच तो कोणत्याही पक्षाची उमेदवारी निश्चित नसलेल्या, परंतु निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्येही दिसून येत आहे. अशाच एका उमेदवाराच्या जाहिरातीच्या फलकावर फोटोसह आपला फोटो लावलेल्या आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारडा सर्कल येथील रस्ता दुभाजकाच्या वाहतूक बेटावर संशयित आरोपी ताहेर कोकणीयाने नाशिक महानगरपालिकेच्या पूर्व विभाग कार्यक्षेत्रात महापालिकेच्या लेखी परवानगीशिवाय दि. ७ मार्च रोजी जाहिरात फलक लावला होता.याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी कारवाई केली असता गुरुवारी (दि.१४) फलकावर एका इच्छुक उमेदवारासह संशयित आरोपीचाही फोटो पोलिसांना मिळून आला. त्यामुळे पोलिसांनी संशयित आरोपी ताहीर कोकणी याच्याविरोधात अनधिकृत जाहिरात फलक लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
अनधिकृत जाहिरात फलक लावणाऱ्यांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 1:20 AM