नाशिक : पंचवटी परिसरात जातीय तेढ निर्माण करण्याच्या कुटील हेतूने आक्षेपार्ह मजकूर लिहिलेले पत्रके शनिवारी मध्यरात्री वाटप करण्यात आल्याने सकाळपासूनच परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. पंचवटी भागात शहर पोलिसांकडून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, ज्या संघटनेच्या लेटरहेडवर आक्षेपार्ह मजकूर लिहून पत्रके वाटली गेली त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याचा या प्रकारात कुठलाही सहभाग नसल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी जाहिर प्रसिद्धी पथकान्वये दिली आहे.
आयुक्तालयाकडून सर्व नाशिककरांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या मुख्य संशयिताने हा प्रकार केला त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्व समाजबांधवांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीप मिटके आदींने केले आहे. समाजबांधवांनी संयम व शांतता कायम ठेवून कायद्याचे पालन करत जागरूक व सुजाण नागिरकाची भूमिका बजावणे गरजेचे आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा ज्या कोणी इसमाने प्रयत्न केला आहे, त्या मुख्य संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे, असे आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ज्या संघटनेच्या लेटर हेडवर हे पत्रके वाटण्यात आली त्या पदाधिकाऱ्याचे व मुख्य संशयित आरोपी यांच्यामध्ये जुने वैयक्तिक वाद होते. यामुळे त्या व्यक्तीला त्रास व्हावा, या उद्देशाने त्याने त्याचे छायाचित्र असलेल्या लेटरहेडवर आक्षेपार्ह मजकूर छापून ती पत्रके वाटप केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.