इंदिरानगर : उपनगर येथील रमाई बहुउद्देशीय हॉल सील करण्यापासून ते पावसाळी कामे होत नसल्याबद्दल पूर्व प्रभागच्या विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांच्याविरुद्ध सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत जाब विचारला. कामे करण्याची इच्छा नसेल तर मूळ सेवेत परत जा, असेही सदस्यांनी यावेळी सुनावले.पूर्व प्रभाग समितीची सभा सभापती नीलिमा आमले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नेहमीप्रमाणे कोरमअभावी सुमारे तासभर उशिराने सुरू झालेल्या सभेच्या प्रारंभी प्रा. कुणाल वाघ यांनी उपनगर येथील रमाई बहुउद्देशीय हॉल सील करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला. विभागीय अधिकाऱ्यांनी हेतूपुरस्सर सभागृह सील करण्याची कारवाई केल्याचा आरोप वाघ यांनी केला. याबाबत विभागीय अधिकाऱ्यांसह संबंधितांवर गुन्हे दाखल करणार असल्याचेही वाघ यांनी स्पष्ट केले. इंदिरानगर येथील सिटी गार्डनलगत असलेल्या जॉगिंग ट्रॅकजवळील शौचालयाची दुरवस्था झाल्याचे यशवंत निकुळे यांनी सांगितले. याशिवाय, पावसाळी कामे तातडीने हाती घेण्याची सूचनाही त्यांनी केली परंतु अभ्यास करून आपण कामांबाबत निर्णय घेऊ, असे उत्तर विभागीय अधिकाऱ्यांनी दिल्याने सदस्य आक्रमक झाले. पावसाळी कामांसाठी अभ्यासाची गरज लागत असल्याबद्दल निकुळे यांनी जाबही विचारला. प्रभागात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असल्याची तक्रार मेघा साळवे यांनी केली. तर द्वारका येथील समांतर रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली असल्याचे संजय साबळे यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी झालेल्या चर्चेत सतीश सोनवणे, अर्चना जाधव, शबाना पठाण, अर्चना थोरात यांनी सहभागी होत प्रशासनाला जाब विचारला. यावेळी दहा लाखांच्या विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली. यावेळी विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड, हेमंत पाटील, पाटोळे आदि अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विभागीय अधिकाऱ्याविरुद्ध सदस्य आक्रमक
By admin | Published: July 17, 2016 12:44 AM