अजित पवारांविरुद्ध व्हॉट्सॲप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट; पोलिस तपासात तरुणाबद्दल धक्कादायक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 09:27 IST2025-02-20T09:21:38+5:302025-02-20T09:27:08+5:30
अजित पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह भाषेत व चिथावणी देणारा मजकूर असलेला मेसेज पोस्ट करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

अजित पवारांविरुद्ध व्हॉट्सॲप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट; पोलिस तपासात तरुणाबद्दल धक्कादायक माहिती समोर
NCP Ajit Pawar : दोन दिवसांपूर्वी देवळाली कॅम्प-नाशिकरोड भागातील एका राजकीय पक्षाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर असलेली पोस्ट व्हायरल झाली होती. पोलिसांनी तत्काळ गंभीर दखल घेत संबंधित पोस्ट करणारा संशयित ४५ वर्षीय संतोष फोकणे याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो रेल्वेचा चतुर्थ श्रेणी कर्मचारी असल्याचे समोर आलं आहे.
भगूर-पांढुर्ली रस्त्यावर वेताळबाबा रोडवरील विजयनगर येथील मैदानात भगूर नगर परिषद पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम दोन दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार येणार होते. या पार्श्वभूमीवर देवळाली विधानसभा मतदारसंघातील काही राजकीय पक्षांच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर संशयित फोकणे याने अजित पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह भाषेत व चिथावणी देणारा मजकूर असलेला मेसेज पोस्ट केला. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेत तातडीने फोकणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले. हवालदार पंढरीनाथ आहेर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फोकणेची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसल्याची माहिती तपासात समोर आली आहे, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे यांनी सांगितले. गुन्ह्यात तीन वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असल्याने फोकणे यास पाच दिवस पोलिस ठाण्यात नियमितपणे सक्तीने हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे, असे पिसे म्हणाले.
राजकारणाशी संबंध नाही!
फोकणे हा रेल्वेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी असून, तो कर्जबाजारी आहे. यामुळे सातत्याने दारूच्या नशेत असतो. त्याने दारूच्या नशेतच व्हॉटसॲप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्याचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. तसेच त्याची राजकीय पार्श्वभूमीदेखील नसल्याने पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.