अझहर शेख, नाशिक : विरोधी पक्षनेते तथा खासदार राहुल गांधी यांनी जाहिर सभेत केलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविरोधी वक्तव्याबाबत निर्भय फाउण्डेशनचे अध्यक्ष देवेंद्र भुतडा यांनी २०२२साली न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन जिल्हा न्यायालयानेराहुल गांधी यांना अतिरिक्त मुख्य सत्र न्यायाधीश दिपाली कडुसकर यांच्या न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले आहे.
२०२२साली हिंगोलीमध्ये झालेल्या जाहिर सभेत राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविरूद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर आक्षेप घेत निर्भया फाउण्डेशनने न्यायालयात दाद मागितली होती. यावेळी त्यांच्याकडून न्यायालयात सावरकर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील संबंधांविषयीचे दाखले सादर करण्यात आले. ज्याप्रकारे आक्षेपार्ह वक्तव्य गांधी यांनी केले होते, त्या वक्तव्यामध्ये बीजेपी पक्षाचा उल्लेख होता. सावरकर असताना हा पक्षदेखील नव्हता, असेही न्यायालयात सांगण्यात आल्याची माहिती निर्भय फाउण्डेशनकडून बाजू मांडणारे ॲड.मनोज पिंगळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
सादर करण्यात आलेली माहिती, पुराव्यांअधारे न्यायाधीश कडुसकर यांनी सीआरपीसी कलम २०४ व भादंवि कलम ४९९ व ५०४ नुसार समन्स बजावले आहे. देशभक्त व्यक्तीवरोधात आक्षेपार्ह वक्तव्य हे मानहानीकारक असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, असे न्यायालयाने समन्सच्या आदेशात म्हटले आहे.