नाशिक : वृक्ष निर्जीव नाहीत तर सजीव आणि परोपकारी आहेत. त्यांच्या हत्येचे समर्थन होऊ शकत नाही अशा शब्दात त्या वृक्षहत्येचा तीव्र शब्दात निषेध करतानाच होलीक्रॉस चर्चजवळील ‘त्या’ आम्रवृक्षाला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ‘वृक्ष’हत्येच्या ‘मुळा’पर्यंत पोहोचण्यासाठी फादर वेन्सी डिमेलो आता उपोषण करणार आहेत. रविवारी (दि.१६) सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमात हत्या झालेल्या वृक्षासाठी ख्रिश्चन धर्मातील विधीप्रमाणे प्रार्थना करून पवित्र जल त्या झाडाच्या समाधीस्थळावर शिंपडण्यात आले आणि त्यानंतर होली क्रॉस चर्चमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विशेष म्हणजे रविवारी जागतिक ओझोन दिन तर होताच, शिवाय ख्रिश्चन बांधवांचा पवित्र वधस्तंभाचा सणदेखील होता.नाशिक शहरातील होलीक्रॉस चर्चलगतच असलेले हे झाड १९६७ साली स्पेन संतपुरुष फादर बारां को यांनी लावले होते. रस्त्याला व अन्य कोठेही अडथळा नसलेल्या या वृक्षाची गेल्या रविवारी रात्री अज्ञातांनी हत्या केली, अगदी मुळासकट झाड नष्ट करून त्यावर वाळू टाकण्यात आली आणि पुरावा नष्ट करण्याचादेखील प्रयत्न करण्यात आला. राष्टÑसेवा दलाचे कार्यक्रर्ते असलेल्या फादर वेन्सी डिमेलो यांनी यासंदर्भात व्हॉट््स अॅपवरआपल्या भावना व्यक्त करणारी पोस्ट टाकल्यानंतर रविवारी (दि.१६) सायंकाळी चर्चजवळील जागेत प्रार्थना सभा घेण्यात आली. तसेच तेथून सर्वांनीच वृक्षाच्या त्या समाधीस्थळी जाऊन पवित्र जल शिंपडून विधी पार पाडले. अपराध्यांना क्षमा कर, अशी विनवणी करण्यात आली. त्यानंतर चर्चमध्ये मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. झाड कोणत्याही व्यक्तीचे नसते तसेच ते धर्माचे नव्हे तर जगाचे असते. त्यामुळे पर्यावरण म्हणून सर्वांनीच झाडांची काळजी घेण्याची गरज आहे. असे असताना निर्दयीपणे झाडे तोडली जातात आणि त्याबद्दल कोणाला खेदही वाटत नाही. चर्चजवळील एक झाड हे कुटुंबातील वयोवृद्ध आजोबांप्रमाणे सर्वांनाच सावली देत असताना त्याची हत्या करणाऱ्यांचा करंटेपणा बाहेर यावा आणि वृक्षहत्येच्या मुळाशी जाण्यासाठी आता आपण साखळी उपोषण करणार असल्याचेही फादर डिमेलो यांनी सांगितले.
हत्या झालेल्या ‘त्या’ वृक्षाला श्रद्धांजली अर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 1:02 AM