पेठ : येथील कृषी विभागाचे मंडल कृषी कार्यालय अनेक दिवसांपासून बंद असून, परिसरातील शेतकऱ्यांना शासकीय कामकाजासाठी हेलपाटे मारावे लागत असल्याने अखेर संतापलेल्या शेतकऱ्यांनी सरळ तालुका कृषी अधिकारी व नायब तहसीलदार यांच्याकडे कैफियत मांडल्याने या कार्यालयाचा पंचनामा करण्यात आला. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मंडल कृषी कार्यालय सुरू करण्यात आले. पेठ विभागाचे कार्यालय सुलभानगर येथील एका खासगी इमारतीत भरत असून, सदरचे कार्यालय कायमच बंद राहत असल्याने शेतकरी कामानिमित्त येतात मात्र त्यांना मंडल अधिकारी, जकातदार यांचे कधीही दर्शन झाले नाही. शिवाय या कार्यालयाला कोणताही नामफलक नसल्याने शेतकऱ्यांचा संभ्रम होतो. बुधवारी अखेर संतापलेल्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी शीलानाथ पवार यांची भेट घेऊन कैफियत मांडली. पवार यांनी नायब तहसीलदार हांडोरे यांच्या समवेत कार्यालयीन वेळेत नागरिकांसह भेट दिली असता कार्यालय बंद असल्याचे आढळून आले. याबाबत रीतसर पंचनामा करून कारवाईचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यात येईल, असे तालुका कृषी अधिकारी पवार यांनी सांगितले. याप्रसंगी कांतीलाल राऊत, जनार्दन चौधरी, भारत राऊत यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)
कृषी मंडल कार्यालय वाऱ्यावर
By admin | Published: March 24, 2017 11:58 PM