नाशिक : नुकत्याच झालेल्या बदल्यांच्या कार्यवाहीत एका विभागाने मोठे अर्थकारण करीत ‘माया’ गोळा गेल्याची चर्चा असून, बदल्यांच्या कामकाजात ‘प्रावीण्य’ असलेल्या संबंधित अधिकाऱ्याने एका सदस्यासोबत बोलताना त्याची कबुली दिल्याने जिल्हा परिषदेतील यंत्रणेत मोठा भूकंप येण्याची चिन्हे आहेत.विशेष म्हणजे या संपूर्ण बदल्यांच्या प्रकरणात एका पदाधिकाऱ्यानेही महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्याची चर्चा असून, या बदल्या करणाऱ्या अधिकाऱ्याने एका पदाधिकाऱ्याला यातून वाचविण्यासाठी ‘साकडे’ घातल्याची चर्चा आहे. परजिल्ह्यातून ज्या बदल्या नाशिकला करण्याचे प्रस्तावित होते, त्याच दोन डझन कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची नस्ती मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नाकारल्याने हा घोळ उघड झाल्याचे समजते.एका आदिवासी तालुक्यातील महिला कर्मचाऱ्याकडून आंतरजिल्हा बदलीच्या अपेक्षेने अर्थपूर्ण ‘घडामोडी’ केल्यानंतर संबंधित महिला कर्मचाऱ्याची बदली करण्यास टाळाटाळ झाल्यानंतर या महिला कर्मचाऱ्याने त्या तालुक्यातील दोघा जिल्हा परिषद सदस्यांच्या कानी हा प्रकार टाकला.संबंधित महिला कर्मचाऱ्याला न्याय देण्यासाठी मग त्या तालुक्यातील एक सदस्य व महिला जिल्हा परिषद सदस्याचे पती संबंधित बदल्यांचे कामकाज करण्यात ‘प्रावीण्य’ असलेल्या अधिकाऱ्याकडे गेले. ‘अर्थपूर्ण’ चर्चा होऊनही या महिला कर्मचाऱ्याला न्याय का मिळाला नाही? याची विचारणा त्या तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्याने संबंधित अधिकाऱ्याला विचारणा केली. त्यावर आपण तर बदल्यांची नस्ती प्रस्तावित केली होती. मात्र ती तूर्तास थांबविण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. (प्रतिनिधी)
एक पदाधिकारीही संशयाच्या भोवऱ्यात : सीईओंनी नाकारल्या बदल्या
By admin | Published: June 21, 2016 10:21 PM