घोटी : सहकारी संस्थेच्या थकबाकीदारांनी थकबाकी भरली नाही तर संचालकांकडून वसूल करण्याच्या कारवाईचा बडगा सहकार विभागाने उचलला आहे. ही कारवाई थांबविण्यात यावी यासाठी संचालकांनी सहायक निबंधक यांना निवेदन दिले आहे. इगतपुरी तालुक्यातील सहकारी संस्थेच्या थकबाकीदारांनी कर्जाची थकबाकी भरावी यासाठी संचालकांनी पुढाकार घ्यावा, तसेच ही थकबाकी भरली नाही तर संचालकांकडून वसूल करण्याचा कारवाईचा बडगा सहकार विभागाने उचलला असून, ही थकबाकी येत्या ३१ पर्यंत न भरल्यास संचालकास अपात्र करण्याचा सहकार विभागाचा निर्णय अन्यायकारक असल्याने हा निर्णय मागे घ्यावा व थकबाकी भरण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आज संचालकांनी सहायक निबंधकांकडे केली. घोटीतील विभागीय कार्यालयात आज सहकारी संस्थांच्या संचालकांची, सचिवांची आणि बँकेच्या अधिकारी यांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ही मागणी करण्यात आली. दरम्यान या मागणीसाठी संचालकांचे शिष्टमंडळ येत्या दि.४ एप्रिल रोजी सहकारमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे निश्चित करण्यात आले. या बैठकीस माजी आमदार शिवराम झोले, नारायण पढेर, रामदास आव्हाड, भास्कर पोरजे आदींसह शेकडो संचालक आणि सचिव हजर होते.
सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची सहायक निबंधकांकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:12 AM