नाशिक : सात तहसीलदारांचे निलंबन मागे घेण्याच्या मागणीसाठी पुरवठा खात्याच्या कारभारावर महसूल खात्याने टाकलेल्या बहिष्कारामुळे या खात्याचे कामकाज पूर्णत: ठप्प झाले असून, तालुक्यांच्या शासकीय गुदामावरही गुदामपालांनी नकार दिल्यामुळे अन्नधान्य महामंडळातून आलेले धान्य विना उतरविताच परत पाठविण्यात आले आहे. बुधवारी दुपारनंतरच महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे अस्त्र उपसल्यामुळे पुरवठा खात्याचे कामकाज काही काळासाठी बंद झाले होते. त्यानंतर संघटनेने राज्यपातळीवरच याबाबतचा निर्णय घेतल्यामुळे गुरुवारी सकाळपासूनच पुरवठा खात्याशी संबंधित कर्मचाऱ्यांनी कार्यालयात बसून काम बंद केले. विशेष करून जिल्हा पुरवठा कार्यालयात सारेच कर्मचारी महसूल खात्याचे असल्यामुळे प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांच्यासह तीन नायब तहसीलदार व एक तहसीलदार तसेच बारा कर्मचाऱ्यांनी कार्यालयात हजेरी कायम ठेवीत कामकाजावर बहिष्कार टाकला. तशीच परिस्थितीत शहर धान्य वितरण कार्यालयाची असून, कर्मचाऱ्यांअभावी या कार्यालयाला कुलूपच ठोकण्यात आले. तालुक्याच्या ठिकाणीही पुरवठा खात्याची कामे करणाऱ्या अव्वल कारकून, कारकुनांना अन्यत्र कामे सोपविण्यात आले. दरम्यान, दर महिन्याच्या पंधरा तारखेनंतर अन्नधान्य महामंडळातून धान्य उचलण्यास सुरुवात केली जाते. अन्नधान्य महामंडळातून ते थेट तालुक्याच्या शासकीय गुदामावर पोहोचविण्याची व तेथे धान्य उतरवून घेण्याची कार्यवाही केली जाते. ही कार्यवाही पूर्ण झाली तरच शिधापत्रिकाधारकांना पुरेसे धान्य दरमहा मिळू शकते. मात्र आता महसूल कर्मचारी, अधिकाऱ्यांनीच या कामावर बहिष्कार टाकल्यामुळे ही सारी प्रक्रियाच ठप्प झाली असून, त्याचा परिणाम जून महिन्याच्या धान्य वितरणावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गुरुवारी अन्नधान्य महामंडळातून एकही धान्याचा ट्रक शासकीय गुदामावर पाठविण्यात आलेला नाही, तर बुधवारी गुदामासमोर धान्य उतरवून घेण्यासाठी आलेले ट्रक माघारी पाठविण्यात आल्याचे वृत्त आहे.
पुरवठा खात्याचे कामकाज ठप्प कार्यालयात शुकशुकाट : कर्मचारी वर्ग
By admin | Published: May 22, 2015 1:35 AM