मनोज मालपाणी नाशिकरोडकेंद्र शासनाने स्मार्ट सिटी अभियानात नाशिक शहराचा समावेश केल्याने पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रदूषणमुक्ती व शरीराचे आरोग्य स्मार्ट राहावे म्हणून सहकारी संस्था दुग्ध नाशिक विभागाचे उपनिबंधक बी. वाय. पगारे यांनी बुधवारी घरापासून १७-१८ किलोमीटर अंतरावर असलेले कार्यालय चक्क सायकलवरून गाठले. पगारे यांच्या या उपक्रमामुळे त्यांच्या कार्यालयातील अनेक अधिकारी-कर्मचारी यांनी आठवड्यातून एक दिवस सायकलचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.केंद्र शासनाच्या ‘स्मार्ट सिटी अभियान’च्या दुसऱ्या फेरीमध्ये नाशिकचा समावेश करण्यात आल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले. नाशिक शहर स्मार्ट होऊन सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा निर्माण होतील. मात्र हे सर्व होत असताना निसर्ग, पर्यावरण, शरीराचे आरोग्य याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. शहरासोबत निसर्ग, शरीर स्मार्ट राहिले पाहिजे म्हणून पगारे यांनी एक दिवस सायकलवरून कार्यालयात येण्याचा निर्णय निश्चित केला.दररोज ४-५ किलोमीटर सायकलवरून फिरणारे ५८ वर्षांचे पगारे नेहमीपेक्षा बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास हेल्मेट घालून देवळाली कॅम्प लॅमरोड येथील संसरी गावातील घरून निघाले. यावेळी घरच्या लोकांनी गाडी, ड्रायव्हर आला नाही, सायकलवर जाऊ नका, रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ असते असे सांगत सायकलवरून जाण्यास विरोध केला. मात्र मनोमन पक्का निर्णय केलेल्या पगारे यांनी घरच्यांना सायकल देवळाली कॅम्पला लावून जाणार असल्याचे सांगत निघाले. घरापासून १७-१८ किलोमीटर लांब असलेले कार्यालय पगारे यांनी सायकलवरून लॅमरोड, विहितगाव, वडनेर पाथर्डी रोड, इंदिरानगर मार्गे त्र्यंबक रोडवरील सहकारी संस्था दुग्ध नाशिक विभागाचे कार्यालय तास-सव्वा तासंमध्ये गाठले.पगारे यांनी बुधवारी दिवसभर कार्यालयातील कामकाज करून सायंकाळी द्वारका, नाशिक-पुणे महामार्ग, बिटको चौकातून लॅमरोड मार्गे घरी गेले. यावेळी दत्तमंदिर सिग्नल जवळ बोलताना पगारे म्हणाले की, निसर्गाची काळजी व इंधनाची बचत प्रत्येकाने केलीच पाहिजे. सायकलचा वापर केल्याने शरीर तंदुरुस्त राहते. प्रदूषण रोखण्यासाठी सायकलचा वापर वाढल्यास रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी, अपघाताचे प्रमाणदेखील कमी होईल. स्मार्ट सिटी करताना रस्त्यावर सायकलस्वारांसाठी स्वतंत्र ट्रॅक (मार्ग) निर्माण केला पाहिजे, असे सांगत पगारे यांनी दर आठवड्याच्या सोमवारी कार्यालयात सायकलवरून जाणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
आठवड्यातून एक दिवस सायकलने कार्यालयात
By admin | Published: September 23, 2016 1:30 AM